गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ांसह संपूर्ण विदर्भावर सातत्याने राज्य आणि केंद्र सरकार अन्याय करीत आहे. येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. तोकडी मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता या शासनाला खरी आकडेवारी दाखवून देण्याकरिता भारतीय जनता पक्ष ओल्या दुष्काळाची आकडेवारी गोळा करणार आहे.
गोंदिया येथील के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात भव्य इमारत तयार करण्यात आली. इमारत पूर्ण होऊन चार महिने लोटले. परंतु ती सर्वसामान्यांच्या सेवेत खुली करण्यात आली नाही. येथील नेत्यांच्या नेतागिरीचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. येत्या सात दिवसात इमारत खुली करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पक्ष कुलूप उघडून लोकार्पण करणार असल्याचा इशारा विधानसभेतील भाजपचे उपनेते आमदार नाना पटोले यांनी दिला. गोंदिया येथील आशीर्वाद कॉलनीत पटोले यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचा प्रारंभ वास्तुपूजन करून केला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. आतादेखील मराठवाडय़ातील कोरडय़ा दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे टँकर आणि जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. यांवर शासनाने तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च केले. विदर्भात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शासनाने तोकडी मदत जाहीर केली. तिच्या वाटपाचे निकषदेखील सदोष आहेत. विधानसभेत या संदर्भात आवाज उचलला, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासन योग्यरित्या सर्वेक्षण करत नाही. त्यामुळे अनेकांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. यावर उपाय म्हणून भारतीय जनता पक्ष प्रत्येक गावातील नुकसानीचे सर्वेक्षण करून त्याची आकडेवारी शासनाला सादर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मिळावी, ज्यांची घरे पडली त्यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घरे बांधून द्यावी, अशी आग्रही मागणी केली. गोंदिया येथील के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात इमारत तयार करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ती रुग्णालयाला हस्तांतरित केली. येथील नेत्यांनी श्रेय लाटण्याच्या स्वार्थापोटी लोकार्पण थांबवून ठेवले. त्यामुळे रुग्णांना खाली झोपावे लागते. येत्या सात दिवसांत ती इमारत सर्वसामान्यांकरिता खुली करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पक्ष इमारतीचे कुलूप उघडणार असल्याचा इशारादेखील पटोले यांनी दिला.
यावेळी त्यांच्यासह भाजपचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आमदार दयाराम कापगते, खोमेश रहांगडाले, सभापती कुसन घासले, मदन पटले, सीता रहांगडाले, नगरसेविका भावना कदम, श्रद्धा नाखले, माजी सभापती विजय रहांगडाले आदी उपस्थित होते.