पश्चिम नागपुरातील मतदारांनी विद्यमान आमदार भाजपचे सुधाकर देशमुख यांना एकहाती कौल देत विधानसभा निवडणुकीत विजयी केले. देशमुख यांनी कॉंग्रेसचे उमेदवार व माजी महापौर विकास ठाकरे यांना २६,४०२ मतांनी पराभूत करीत विजय संपादन केला.
मतमोजणीच्या १६ फे-यानंतर देशमुख यांना ८६,५०० तर ठाकरे यांना ६०,०९८ मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे अहमद कादर  हे तिस-या क्रमांकावर राहिले व त्यांनी १४,२२३ मते मिळवलीत. राष्ट्रवादीच्या प्रगती पाटील यांना ४,०३१ मते, मनसेचे प्रशांत पवार यांना ३,३९३ तर शिवसेनेचे विकास अंभोरे यांना केवळ ११८० मते मिळाली. मतदारसंघातील इतर  उमेदवारांना मतदारांनी साफ झिडकारले. अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात टपालद्वारे प्राप्त झालेल्या मतांपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. तिस-या फेरीचा अपवाद वगळता टपाल मतांसह सर्वच फे-यांमध्ये देशमुख यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम राखली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप व कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळी सात वाजतापासून उत्सुकतेपोटी गर्दी करणा-या कार्यकर्त्यांंना मतमोजणी केंद्रापासून बरेन दूर कठडे घालून अडविण्यात आले होते.  राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रगती पाटील, आमदार प्रकाश गजभिये हे अगदी सुरुवातीपासून मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते.  सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप व काँॅंग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते मात्र जसा एकेका फेरीचा निकाल हाती येऊ लागला तसतसा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह मावळायला लागला होता. प्रत्येक फेरीगणिक देशमुख यांची आघाडी वाढत गेली व १६ व्या फेरीअखेर त्यांना  विजयी घोषित करण्यात आले.
देशमुख आघाडी घेत असल्याची बातमी पसरल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी वाढू लागली. भाजपचे झेंडे हाती घेतलेले तरूण ‘मोदी, मोदी’ घोषणा देत होते. ढोलताशांच्या निनादात भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांचा विजय साजरा केला. अनेक वयस्क व महिलांसह पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात यावेळी उपस्थित होते व एकमेकांना शुभेच्छा देत होते. पक्षाला नागपूर जिल्ह्य़ात तसेच इतरत्र मिळालेल्या यशाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.

एकूण मतदान-     १,७३,९१९
नकाराधिकाराची मते-      ११४३
टपाल मते-    ४९७
रद्द मते-     १०