सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी हरकुंडे यांनी रद्द केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सोनबा मुसळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. तर रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग यांनी भाजपचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा अर्ज मात्र स्वीकृत केला.
याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनीष अरविंद मोहोड यांनी सोनबा मुसळे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. शासकीय कंत्राटदार असल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी सोमवारी झालेल्या अर्जाच्या छाननीप्रसंगी त्यांनी केली होती. त्यानुसार हरकुंडे यांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता मुसळे यांचा अर्ज रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाला मुसळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. दरम्यान, सोनबा मुसळे यांच्या याचिकेवर नागपूर खंडपीठ काय निर्णय देतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मनीष मोहोड हा त्यांचाच डमी व अपक्ष उमेदवार आहे. दरम्यान, मुसळे यांचा अर्ज रद्द झाल्याचे वृत्त पसरताच तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सोमवारपासूनच सावनेर येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, सोनबा मुसळे यांच्या याचिकेवर नागपूर खंडपीठ काय निर्णय देते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मल्लिकार्जुन रेड्डी यांचासुद्धा निवडणूक अर्ज रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी केली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी व रामटेकचे उपविभागीय अधिकारी शेखर सिंग यांनी रेड्डी यांचा अर्ज स्वीकृत केला. शेखर सिंग यांच्या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान देणार नसल्याचे सेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.