प्रस्थापितविरोधी वातावरणामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर निश्चित मानले जात असताना अनपेक्षितपणे सेना-भाजप युतीला तडे गेले. परिणामी हमखास विजयी होणाऱ्या शिवसेनेला विदर्भात मतविभाजनाचा मोठा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत विदर्भात ६२ पैकी ६० मतदारसंघात युतीने मोठी आघाडी घेतली, पण विधानसभेत स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेला मोठय़ा प्रमाणात फटका बसण्याची शक्यता तंतोतंत खरी ठरली. विद्यमान सेनेच्या आठ आमदारांपैकी फक्त संजय राठोड (दिग्रस) आणि डॉ. संजय रायमुलकर(मेहकर) या दोन जागा राखण्यात सेनेला यश मिळाले. तर भाजपने सेनेच्या पाच जागांवर वर्चस्व स्थापन केले. आकोटमध्ये सेनेच्या संजय गावंडे यांना भाजपच्या प्रकाश भारसाकळे, हिंगणघाट येथे अशोक शिंदे यांना समीर कुणावार, भंडाऱ्यात नरेंद भोंडेकर यांना रामकृष्ण अवसरे, दर्यापूरमध्ये अभिजित अडसूळ यांना रमेश बुंदेले व रामटेकमध्ये अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांना डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी शह दिला. काटोलमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले होते. मात्र, या निवडणुकीत भाजपने त्यांना शह देत राष्ट्रवादीचा गड जिंकला. माजी मंत्री अनिल देशमुख यांना त्यांचाच पुतण्या आशिष देशमुख यांनी भाजपकडून मात दिली. अहेरीचा गडही आजवर काँग्रेस, राष्ट्रवादीनेच राखून ठेवला. भाजपने त्याला खिंडार पाडत अंबरीशराव महाराजातर्फे हा गड आपल्याकडे आणला.