भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच शहरातील पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फडणवीस यांच्या रूपाने शहराला प्रथमच राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळत असल्याने विशेष उत्साहात असलेल्या कार्यकर्त्यांंनी शहरातील विविध भागात फटाके फोडून व घोषणा देत आनंद व्यक्त केला.
निवडणुकीपूर्वीपासून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे सर्वाधिक पसंतीचे उमेदवार म्हणून घेतले जात होते व वेगवेगळ्या सर्वेक्षणांद्वारे देखील त्यांच्या नावावर सर्वाधिक पसंतीची मोहोर उमटली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेली रस्सीखेच अखेर आज थांबली व राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली. फडणवीस  यांचे नाव जाहीर होताच विदर्भासह नागपुरात ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोश केला गेला. जवळपास १५ वर्षांनंतर राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येत असताना मुख्यमंत्री होण्याचा मान प्रथमच एका नागपूरकराला मिळत आहे.
फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शहरातील विविध भागात जल्लोष करण्यात आला. महाल आणि धंतोलीमधील भाजपच्या कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले. यावेळी या दोन्ही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. टिळक पुतळ्याजवळील कार्यालयात भाजयुमोच्या कार्यकत्यार्ंनी ढोल ताशांच्या निनादात जल्लोष केला. या व्यतिरिक्त, कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी स्वयंस्फूर्तीने फटाके फोडून फडणवीस यांच्या निवडीवर आनंद व्यक्त केला.
फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याआधीच दुपारपासून धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. ‘आमदार,  दक्षिण पश्चिम नागपूर’ अशी पाटी मिरवणा-या  फडणवीसांच्या बंगल्याकडे आज मतदार संघातील अनेकांची पावले वळत होती. देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार ही बातमी दूरचित्रवाणी व सोशल मीडियावरून पसरताच धरमपेठेत एकच जल्लोष झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांसकट फडणवीस यांचे बालमित्र, जुने सहकारी, नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी फटाके फोडून व तोंड गोड करून हा क्षण साजरा केला.  मागील अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून ज्याच्यावर कायम विश्वास टाकला, त्याचे राजकारणातील पुढचे महत्त्वाचे पाऊल साजरे करण्यासाठी  दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघासहित संपूर्ण शहरातून समर्थकांनी सायंकाळपर्यंत त्यांच्या निवासस्थानासमोर एकच गर्दी केली होती. महिला कार्यकर्त्यांनी देखील
फुगडय़ा खेळून व ‘देश का नेता कैसा हो.. देवेंद्र फडणवीस जैसा हो’ सारख्या घोषणा देत फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदी नाव जाहीर होण्याच्या क्षण साजरा केला.

आईचा आशीर्वाद
‘अवघ्या देशाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र देवेंद्रच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत घडावा. केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्याचा- विशेषत: मागास भागांचा विकास त्याच्या हातून व्हावा,’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी आपल्या आशीर्वादरुपी भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून निश्चित होणार अशी कुणकुण लागताच त्यांच्या निवासस्थानासमोर माध्यम प्रतिनिधींनी देखील गर्दी केली होती. फडणवीस यांच्या पत्नी अमृता मुंबईकरिता निघून गेल्यावर फडणवीस यांच्या  मातोश्री माध्यमांना सामोरे जात होत्या. त्यांची प्रतिक्रिया व छायाचित्र घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधीं व छायाचित्रकारांची एकच घाई सुरू होती. दूरचित्रवाणीवर बातम्या बघत बघत त्यांनी माध्यमांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ‘वयाच्या २२ व्या वर्षी महापौर व ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री हा देवेंद्रचा प्रवास बराच मोठा आहे. लहानपणी त्याला विमानात बसायची फार ईच्छा होती. आज रोजच त्याचा विमानप्रवास सुरू असतो. अगदी लहान वयापासून तो राजकारणात आहे. कुटुंबासाठी म्हणून आम्ही त्याला कधीही अडवले नाही,’’ असे त्या म्हणाल्या. आज गंगाधरराव फडणवीस हयात असते तर कदाचित देवेंद्र राजकारणात आलाही नसता. ते गेल्यानंतर त्यांचे काम पुढे चालविण्यासाठी असेही त्यांनी बोलून दाखविले