विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची की शिवसेनेशी युती करून, मतदारसंघात अदलाबदल अपेक्षित आहे काय, ज्या ठिकाणी असे बदल अपेक्षित आहे, तिथे भाजपची बुथनिहाय रचना काय, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणत्या केंद्रीय मंत्र्यावर सोपविली जावी, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे धुंडाळण्याचा प्रयत्न शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीने केला. लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे उत्साह संचारलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वबळावर विधानसभेला सामोरे जाण्याचा आग्रह धरला. काहींनी शिवसेनेच्या ताब्यातील जागा भाजपकडे घेण्याची मागणी केली. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारसह अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भाजपच्यावतीने विभागनिहाय आढावा घेण्याच्या प्रक्रियेचा शुक्रवारी नाशिक येथे आयोजित बैठकीद्वारे श्रीगणेशा करण्यात आला. सिडकोतील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीस कोअर कमिटीचे सदस्य अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आ. पंकजा मुंडे उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची स्थिती, त्या ठिकाणी कार्यरत असणारी यंत्रणा, मागील निवडणुकीत सेना-भाजपकडे असणारे मतदारसंघ या अनुषंगाने नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. जिल्हा व शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांशी साधारणत: अर्धा तास चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वाच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच उत्साह झळकत होता. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने विरोधकांना पुरते भुईसपाट केले. विधानसभा निवडणुकीत तो फॉम्र्युला वापरल्यास भाजप राज्यातील सत्ता सहजपणे हस्तगत करू शकते, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळे कोअर कमिटीसमोर अनेकांनी स्वबळाचा मुद्दा लावून धरला. गतवेळी किती जागा भाजपकडे होत्या, किती जागा शिवसेनेकडे याची चर्चा करताना लोकसभा निवडणुकीत त्या त्या ठिकाणी मिळालेली मते याचा आढावा घेतला गेला. त्यावरून कोणकोणत्या जागांमध्ये अदलाबदल करता येईल, याची चाचपणी करण्यात आली. ज्या मतदारसंघात जागांमध्ये बदल अपेक्षित आहे, तिथे भाजपची बुथनिहाय रचना आहे काय, पक्षाची ताकद किती याची चौकशी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्याची धुरा एकेका केंद्रीय मंत्र्याकडे सोपविली जाणार आहे. यामुळे जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांना कोणत्या मंत्र्याकडे ही जबाबदारी सोपविली जावी याची विचारणा करण्यात आली. बुथनिहाय रचना करण्याकडे सर्वानी प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे. ही रचना पूर्णत्वास गेल्यानंतर विधानसभा प्रमुखांची नावे जाहीर केली जातील, असेही सूचित करण्यात आले. आढावा बैठकीत आगामी निवडणुकीत आपणास तिकीट मिळावे, यादृष्टीने काहींनी व्युहरचना करून प्रश्नांना उत्तरे दिल्याचे पाहावयास मिळाले. नाशिकहून सुरू झालेली विभागीय आढावा घेण्याची प्रक्रिया पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, अमरावती या ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले.