भाजपने देशभरात सदस्य मोहीम राबविल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने केलेले काम आणि राबविण्यात येत असलेल्या योजना पोहोचविण्यासाठी महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत असले तरी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांंच्या नाराजीमुळे विदर्भात या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशभर सदस्य मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर देशभरात १० कोटी सदस्य अभियानाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याला महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. या अभियानात संपूर्ण देशात १० कोटी सभासद नोंदणीचे लक्ष्य पूर्ण झाल्यामुळे भाजप हा जगातील सर्वाधिक सदस्य असलेला राजकीय पक्ष ठरला आहे. या मोहिमेनंतर पक्षाने ऑनलाईन आणि प्रत्यक्ष करण्यात आलेल्या सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची त्यांना माहिती देण्यासाठी महाजनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना सरकारच्या विविध योजनांची माहिती सदस्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. या मोहिमेला ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांंचा उत्साह दिसत होता तो मात्र या महाजनसंपर्क अभियानात दिसत नाही. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही सक्रिय कार्यकर्त्यांनी काम केल्यानंतर त्यांनी कुठले तरी पद मिळावे किंवा एखाद्या महामंडळावर, समितीवर स्थान मिळावे, ही अपेक्षा होती. मात्र, राज्यात सरकार येऊन अनेक सक्रिय कार्यकर्त्यांंना असे काहीच मिळाले नाही.
गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते नाराज असल्यामुळे ते आपापल्या नेत्यांकडे भावना व्यक्त करीत आहेत. सदस्य मोहिमेत ज्या पद्धतीने कार्यकर्ते सक्रिय झाले होते तो कार्यकर्त्यांंचा उत्साह मात्र गेल्या काही दिवसात दिसून येत नाही. महाजनसंपर्क अभियानासंदर्भात राज्यातील विविध भागात बैठकी घेतल्या जात आहेत. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येत आहे. पक्षातर्फे या अभियानासाठी कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत. मात्र, तिकडेही फारसे कार्यकर्ता फिरकेनासे झाले आहे.
वेगवेगळ्या महामंडळ आणि समित्यांवरील नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून काही विशिष्ट सदस्यांनाच त्यात स्थान दिले जात असून सामान्य कार्यकर्ता मात्र आजही सतरंज्या उचलण्याचे काम करीत असल्यामुळे तो नाराज असल्याचे दिसून येते. पक्षाच्या विविध उपक्रमात कार्यकर्ता फारसा सहभागी होताना दिसत नाही. जनतेच्या समस्या वाढत असून त्याला काही सक्रिय सदस्यांना सामोरे जावे लागत आहे, मात्र त्यांना महत्त्व नसल्याने नाराज कार्यकर्ते अभियानाकडे ते फारसे फिरकत नसल्याचे बोलले जात आहे.

पक्षकार्यासाठी एकत्र -व्यास : या संदर्भात या अभियानाचे उपप्रमुख गिरीश व्यास म्हणाले, अभियानाचे काम सुरू झाले असून विदर्भातील विविध जिल्ह्य़ात बैठकी आणि मेळावे आयोजित केले जात आहेत. जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांना या अभियानाची माहिती दिली जाते. सरकारच्या योजना पोहोचविण्यासाठी साहित्य उपलब्ध झाले नाही. येत्या १२ जूनला मुंबईला या संदर्भात बैठक असून त्यानंतर या अभियानाला विदर्भात सुरुवात होईल. कार्यकर्ता नाराज आहे. ते स्वाभाविक असले तरी पक्ष कार्यासाठी मात्र सर्व एकत्र येऊन काम करतात. या अभियानाकडे दुर्लक्ष करण्यात आले नसून येणाऱ्या दिवसात गावोगावी अभियान सुरू करण्यात येणार आहे.