आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच रेल्वेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अंध व्यावसायिक आणि फेरीवाले सोमवारी (२७ एप्रिल २०१५) दादर येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.
रेल्वे स्थानक परिसरात सुमारे पाचशे अंध व्यक्ती लहान-मोठे व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवीत आहेत. मात्र रेल्वेचे सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांना त्रास देण्यात येतो. या त्रासाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच काही प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरेश प्रभू यांचे कार्यालय, दादासाहेब फाळके मार्ग, शिंदेवाडीसमोर, दादर (पूर्व) येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे.
रेल्वे सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणारा त्रास आणि अरेरावीची वागणूक तातडीने थांबविण्यात यावी, रेल्वे प्रशासनाकडून या अंध व्यावसायिकांना ओळखपत्रासह परवाना देण्यात यावा, या अंध फेरीवाल्यांना रेल्वे परिसरात विशिष्ट जागा निश्चित करून देण्यात यावी, शिक्षित असलेल्या अंध फेरीवाल्यांना रेल्वेत नोकरीसाठी आरक्षण देण्यात यावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
कोअर कमिटी ऑफ युनायटेड फोरम फॉर द राइट्स ऑफ द ब्लाइंडच्या समन्वय समितीचे सुहास कर्णिक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.