मुंबईकरांना शहर स्वच्छ ठेवण्याचे धडे देणाऱ्या पालिकेकडून फक्त बडय़ा व्यक्तींच्या परिसरात सफाई ठेवण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जातात. सर्वच मुंबईकर कर देत असताना केवळ काहींनाच ही सुविधा देण्याबाबत स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी उठवलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष करत सफाईचे कंत्राट पुन्हा वाढवण्यात आले.
मुख्यमंत्री, राज्यपाल, पालिका आयुक्त तसेच इतर मंत्री व व्हीआयपी यांची घरे असलेल्या डी वॉर्डमध्ये प्रत्येक गल्ली, रस्ता २४ तास स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने कंत्राट दिले आहे. हे कंत्राट १५ जानेवारी रोजी संपल्यानंतर पुन्हा वाढवण्यात आले असून त्याच्या कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीत सादर करण्यात आले. वाळकेश्वर, नेपियन्सी रोड, अल्टामाऊंट रोड असा परिसर दिवसाचे २४ तास स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने यावर्षी २१ लाख ८५ हजार रुपयांचे कंत्राट दिले आहे. या परिसरात महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती राहात असून पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वाचा असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र वांद्रे येथील काँग्रेसचे नगरसेवक असिफ झकेरिया यांनी या विरोधात आवाज उठवला. सर्वच मुंबईकर कर देत असताना केवळ एकाच भागातील व्यक्तींना विशेष वागणूक का दिली जाते, शहरात ठिकठिकाणी कचरा पडलेला असताना सर्वत्रच सफाईची गरज आहे. वांद्रे येथील हिल रोड, लिंकिंग रोड येथे रात्री खूप कचरा टाकला जातो. त्यामुळे या भागात सफाई करण्याची मागणी मी वारंवार करत आहे. मात्र त्याबाबत पालिकेकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत, असे झकेरिया म्हणाले. हे कंत्राट आधीच वाढवले गेले असून आता स्थायी समितीकडे पाठवण्यात आले आहे हे दुर्दैव आहे. यासाठी ई-टेंडरिंगही केले गेले नाही, अशी टिप्पणी शीतल म्हात्रे यांनी केली. संपूर्ण मुंबईच पर्यटनस्थळ आहे. पर्यटक केवळ एकाच भागात जात नाहीत, असा टोलाही नगरसेवकांकडून लगावण्यात आला.
सर्वच मुंबईत अशा प्रकारे साफसफाई केली जावी, या मागणीचा निश्चितच विचार केला जाईल, असे प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले. मात्र नगरसेवकांनी विरोध केल्यावरही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.