सायकल वापरणाऱ्यांसाठी रस्त्यावर विशेष मार्गिका ही खरे तर छान व्यवस्था. अशाच उदात्त हेतूने वांद्रे-कुर्ला संकुलात सायकल ट्रॅक बांधण्यात आला. तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्ची पडले. हा अनुभव ताजा असतानाही आता मुंबई महापालिकेला शहरात ‘सायकल ट्रॅक’ बांधण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे हा ‘सायकल ट्रॅक’ प्रकल्प सायकलस्वारांसाठी की कंत्राटदार-अधिकाऱ्यांचे भले करण्यासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुंबईत सायकलस्वारांना उत्तेजन देण्यासाठी आणि सायकलच्या वापरास चालना देण्याच्या ‘उदात्त’ हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सायकल ट्रॅक प्रकल्प राबवण्याचे ठरवले. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुलात पहिला सायकल ट्रॅक प्रकल्प राबवण्यात आला. त्याचे काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झाले आणि एप्रिल २०११ मध्ये पूर्ण झाले. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी ब्लॉक’मध्ये असलेल्या या १९,६५२ चौरस मीटरच्या सायकल ट्रॅकसाठी तब्बल सहा कोटी ४८ लाख रुपये खर्च झाल्याचेही सांगण्यात आले. मोठा गाजावाजा करत मुंबईतील या सायकल ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. पण उद्घाटन होऊन आता अडीच वर्ष उलटून गेले तरी सायकलस्वारांअभावी हा प्रकल्प अपयशी ठरला. सारा पैसा वाया गेला. या अपयशानंतर मुंबईत आणखी सायकल ट्रॅक बांधण्याचा विचार प्राधिकरणाने सोडून दिला.
पण वांद्रे-कुर्ला संकुलाच्या ‘सायकल ट्रॅक’चा प्रकल्प राबवणारे तत्कालीन अतिरिक्त महानगर आयुक्त श्रीनिवास काही महिन्यांपूर्वी पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू होताच त्यांनी पालिकेतर्फे ‘सायकल ट्रॅक’ बांधण्याची टूम काढली. त्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश रस्ते विभागाला देण्यात आले आहेत. दीड ते दोन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक बांधण्याच्या दृष्टीने आता रस्ते विभागाचे अधिकारी मुंबईभर रस्त्यांची पाहणी करत फिरत आहेत.
मुंबईत सध्या रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी पदपथांची रुंदी कमी करण्याचे काम सुरू आहे. तशात आता ‘सायकल ट्रॅक’ बांधण्याचे ठरले तर रस्त्यांच्या रुंदीचे काय होणार? ‘एमएमआरडीए’चे साडेसहा कोटी रुपये पाण्यात गेले असताना या प्रकल्पाचे खूळ कशासाठी अशी कुजबूज पालिकेत सुरू झाली आहे.