शिवसेना-भाजप युती आणि पालिका प्रशासनाने मोठा गवगवा करीत पालिका शाळांमध्ये ज्युनिअर आणि सीनिअर केजीचे वर्ग सुरू केले. तीन वर्षांनी पालिका सेवेत कायम करतो असे वचन देऊन कंत्राटी पद्धतीने शिक्षिकांची भरतीही केली. मात्र तब्बल सात वर्षे उलटूनही आजघडीला या शिक्षिका केवळ पाच हजार रुपये वेतनावर कंत्राटी नोकरीच करीत आहेत. पालिकेच्या सेवेत स्थिरस्थावर होता येईल, ही आशा फोल ठरून या शिक्षिकांच्या नशिबी कंत्राटी नोकरीच आली आहे.
खासगी शाळांमध्ये ज्युनिअर आणि सीनिअर केजी वर्गाचे लोण पसरले आणि ते पालिका शाळांमध्येही पोहोचले. गरीब घरच्या चिमुकल्यांनाही ज्युनिअर-सीनिअर केजी वर्ग उपलब्ध व्हावेत यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि प्रशासनाने डंका पिटत पालिका शाळांमध्ये हे वर्ग सुरू केले. वर्ग सुरू करण्यापूर्वी २००७मध्ये या वर्गासाठी ६० शिक्षिकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली. ही भरती मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून करण्यात आली होती. मुलाखत घेताना तीन वर्षांमध्ये पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे तोंडी आश्वासन पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शिक्षकांना दिले होते. त्यानंतरही ज्युनिअर आणि सीनिअर केजीच्या वर्गासाठी टप्प्याटप्प्याने शिक्षिकांची कंत्राटी पद्धतीनेच भरती करण्यात आली. प्रत्येक वेळी या शिक्षिकांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आश्वासन देण्यात आले.
पालिका शाळांमध्ये ज्युनिअर-सीनिअर वर्गासाठी शिक्षक भरती होत असल्याचे समजताच काही खासगी शाळांमधील शिक्षिकांनीही मुलाखती दिल्या. तूर्तास कंत्राटी पद्धतीने भरती व्हा, पुढे कायम करण्यासाठी विचार होईल, असे आश्वासन मुलाखतीत मिळाल्याने पुढचा-मागचा विचार न करता खासगी शाळेतील नोकरीला रामराम ठोकून या शिक्षिकांनी पालिकेची दरमहा पाच हजार रुपयांची नोकरी स्वीकारली.
पालिकेच्या सेवेत कंत्राटी पद्धतीने भरती होऊन आता सात वर्षे लोटली तरी या शिक्षिकांना सेवेत कायम करण्यात आलेले नाही. दर महिना केवळ पाच हजार रुपये वेतन मिळत असल्याने आणि सेवेत कामय करण्याचे चिन्ह नसल्याने काही शिक्षिकांनी या नोकरीला रामराम ठोकला आहे. तर काही शिक्षिका सोडून जाण्याच्या बेतात आहेत. भरतीच्या वेळी मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आता बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे आपले म्हणणे कोणापुढे मांडायचे, असा प्रश्न या शिक्षिकांना पडला आहे.
२०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या, तर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचे काम आमच्यावर सोपविण्यात आले होते. परंतु त्याचा मोबदला काही शिक्षिकांना अद्यापही मिळालेला नाही, असेही काही शिक्षिकांनी सांगितले.
नव्या ठिकाणी नोकरीला लागण्याचे वय उलटून गेले आहे. त्यामुळे उर्वरित आयुष्य महिना पाच हजार रुपये नोकरीवर काढावे लागण्याची शक्यता आहे. दर महिना केवळ पाच हजार रुपये वेतन मिळत असल्यामुळे घर कसे चालवायचे, असा प्रश्नही अनेकांना भेडसावत आहे.