प्रदूषणाचा भस्मासुर रोखण्यासाठी पर्यावरणस्नेही स्मशानभूमीची संकल्पना पालिका आयुक्तांनी मांडली खरी. पण त्याच वेळी सध्या अस्तित्वात असलेल्या विद्युतदाहिन्यांच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी चंदनवाडी विद्युतदाहिनी स्मशानभूमीतील दोन विद्युतदाहिन्या बंद पडल्यामुळे अन्त्यसंस्कारासाठी दोन-तीन पार्थिव आल्यास त्या घेऊन येणाऱ्यांना रांगा लावून तासन्तास ताटकळावे लागत आहे. तासन्तास रखडल्यानंतर नाइलाजाने नातेवाईकांना पार्थिव घेऊन जवळच्या चंदनवाडी स्मशानभूमीत लाकडावर अन्त्यसंस्कार करावे लागत आहेत. या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा रोष स्मशानभूमीतील पालिका कर्मचाऱ्यांना पत्करावा लागत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यायाने होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विद्युतदाहिनीमध्ये पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात यावेत यासाठी एकेकाळी जनजागृती सुरू करण्यात आली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळू लागला आणि लाकडाऐवजी विद्युतदाहिनीमध्ये पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्याचे प्रमाणही वाढले. मरिन लाइन्स रेल्वे स्थानकानजीक चंदनवाडीत १९५२ साली पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यासाठी विद्युतदाहिनी उपलब्ध करण्यात आली होती. कालमर्यादा संपुष्टात आल्याने १९८७ साली नवी विद्युतदाहिनी बसविण्यात आली. त्यानंतर पुन्हा १९९२-९३ च्या सुमारास पुन्हा नवी विद्युतदाहिनी बसविण्यात आली. दरम्यानच्या काळात विद्युतदाहिनीमध्ये अन्त्यसंस्कार करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या पार्थिवांची संख्या चांगलीच वाढली.
कुलाब्यातील नेव्हीनगर, कफ परेड, धोबीतलाव, चिराबाजार, डोंगरी, माझगाव, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, पेडर रोड, नेपिअन्सी रोड आदी विभागांतील नागरिकांना आपल्या घरात निधन झालेल्या व्यक्तीवर अन्त्यसंस्कार करण्यासाठी चंदनवाडी स्मशानभूमीत यावे लागते. चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये लाकडावर अन्त्यसंस्कार करण्याची सुविधा आहे. तसेच शेजारीच विद्युतदाहिनी स्मशानभूमी असून तेथे तीन विद्युतदाहिन्या उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये विद्युतदाहिनीमध्ये मोठय़ा प्रमाणावर पार्थिवांवर अन्त्यसंस्कार करण्यात येत आहेत. दररोज किमान पाच ते सहा पार्थिव अन्त्यसंस्कारासाठी येथे आणले जातात. मात्र देखभाल योग्य प्रकारे होत नसल्यामुळे गेल्या एक वर्षांपासून एक विद्युतदाहिनी बंद पडली आहे. आता सुमारे सव्वा महिन्यापासून उर्वरित दोनपैकी एक विद्युतवाहिनी बंद पडली आहे. केवळ एकच विद्युतवाहिनी उपलब्ध असल्याने एकाच वेळी दोन-तीन पार्थिव अन्त्यसंस्कारासाठी आल्यानंतर येथील पालिका कर्मचाऱ्यांची धावपळ उडते. तसेच काही वेळा मृत्य व्यक्तीच्या संतप्त नातेवाईकांचा रोषही ओढवून घ्यावा लागतो.

विद्युतदाहिनीमध्ये एका पार्थिवावर अन्त्यसंस्कारासाठी सुमारे दीड तास वेळ लागतो. त्यानंतर विद्युतदाहिनी साफ करावी लागते आणि नंतरच दुसऱ्या पार्थिवावर त्यात अन्त्यसंस्कार केले जातात. एकाच वेळी तीन-चार पार्थिव अन्त्यसंस्कारासाठी आल्यास मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा खोळंबा होतो. तसेच या विद्युतदाहिनी स्मशानभूमीत फारशी जागा नसल्यामुळे पार्थिवासोबत आलेली मंडळी रस्त्यावरच गर्दी करून उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा आणि पादचाऱ्यांनाही त्रास होतो. एका वेळी अधिक पार्थिव विद्युतदाहिनी स्मशानभूमीत अन्त्यसंस्कारासाठी आल्यास चंदनवाडीतील लाकडावरील स्मशानभूमीत जावे, अशी विनंती येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावी लागते. काही वेळा ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या मृत व्यक्तीच्या नागरिकांचा रोष या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. लाकडावरील स्मशानभूमीत पालिकेने लाकडे विनाशुल्क उपलब्ध केली असली तरी हीही स्मशानभूमी खासगी ट्रस्टची असल्याने तेथे सुमारे ४०० ते ५०० रुपये शुल्क घेण्यात येते. विद्युतदाहिनी उपलब्ध नसल्यामुळे हे शुल्क भरून तेथे पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांमार्फत विद्युतदाहिन्यांची देखभाल केली जाते. विद्युतदाहिन्यांची छोटी-मोठी दुरुस्ती करणे या कर्मचाऱ्यांना शक्य आहे. मात्र मोठय़ा प्रमाणावर बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती संबंधित कंत्राटदारामार्फतच करावी लागते. दोन विद्युतदाहिन्या बिघडल्याचे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कळविले आहे. मात्र त्यांच्या दुरुस्तीचा मुहूर्त अद्याप अधिकाऱ्यांना सापडलेला नाही. परिणामी या परिसरातील नागरिकांना नाइलाजाने मृत व्यक्तीच्या पार्थिवावर लाकडावर अन्त्यसंस्कार करावे लागत आहेत.