‘सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई’चे स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रख्यात बोधचित्रकाराकडून ‘माझी मुंबई’ हे बोधचित्र बनवून घेतले आणि त्याचा तात्काळ वापरही सुरू केला. मात्र बोधचित्रकाराने ५५ लाख रुपयांचे बिल सादर केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या योजनेतून हे बोधचिन्ह गायब झाले. बोधचित्रकाराची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
घनकचरा व्यवस्थापनाने मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी ‘माझी मुंबई’ हे बोधचिन्ह प्रख्यात बोधचित्रकारांकडून तयार करून घेतले होते. मोठा गाजावाजा करीत पालिकेने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे प्रकाशनही केले होते. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाने हे बोधचिन्ह वापरण्यास सुरुवात केली. कालांतराने बोधचिन्हकाराने बनवून दिलेल्या बोधचिन्हाचा खर्च म्हणून ५५ लाख रुपयांचे बिल पालिकेला पाठविले होते. बिल हाती पडताच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबेच दणाणले. त्यांनी तात्काळ बोधचिन्हाचा वापर बंद केला. मात्र आजतागायत हा प्रश्न रेंगाळला आहे. या प्रश्नाला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी वाचा फोडली.
बोधचित्रकाराकडून बोधचिन्ह बनवून घ्यायचे आणि काही दिवस ते वापरायचे. त्यानंतर बिल हाती पडल्यानंतर त्याचा वापर थांबवायचा. अशा पद्धतीने बोधचित्रकाराचा अपमान पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. बोधचिन्ह बनवून घेण्यासाठी पुढाकार घेणारे पालिकेचे जनसंपर्क अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी देशपांडे आणि अन्य नगरसेवकांनी या वेळी केली.