गेल्या वर्षी पावसाळा ओसरला आणि खड्डे बुजविणाऱ्या कंत्राटदारांची मुदतही संपुष्टात आली. त्यामुळे संगणक प्रणालीवर खड्डय़ांची नोंद होऊनही ते बुजवता आलेले नाहीत. आता तर उन्हाळा संपण्यास अवघा दीड महिना उरला असताना शहरातील खड्डे दुरुस्तीचे काम मार्गी लागणे तर दूरच त्यासाठीच्या कंत्राटदारांची नियुक्तीही झालेली नाही. आता पावसाळा जवळ आल्यामुळे प्रशासनाने खड्डे बुजविण्याऱ्या कंत्राटदारांच्या नियुक्तीसाठी धावतपळत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराची नियुक्ती होण्यास जून उजाडण्याची चिन्हे असून परिणामी पावसाळा आणि खड्डेमय रस्ते आणि त्यामुळे बेजार होणारे मुंबईकर हेच चित्र कायम राहणार आहे.
सध्या कंत्राटदारच नसल्याने खड्डे ‘जैसे थे’च आहेत. वास्तविक पाहाता गेल्या पावसाळ्यात न बुजविलेले खड्डे मे महिन्यापर्यंत बुजविले जातील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण पालिकेच्या कामचुकार कामगारांनी ती फोल ठरविली आहे.
पावसाळा जवळ आल्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयातील कामगार ठिकठिकाणी कुदळ, फावडी, घमेली, हिराचा झाडू हाती घेऊन खड्डय़ांच्या शोध मोहिमेवर निघाले आहेत. वाटेत दिसेल त्या खड्डय़ात डांबरमिश्रित खडी टाकून तो बुजविण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत. टाकलेल्या डांबरमिश्रित खडीवर कोणत्याही उपकरणाने दाब न देताच कामगार पुढच्या खड्डय़ाच्या शोधात निघून जात आहेत. त्यामुळे खड्डय़ातील डांबर-खडी खड्डय़ावरून वाहन जाताच रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ होत आहे. मुंबईकरांनी कररूपात पालिकेच्या तिजोरीत जमा केले पैसे कामगारांच्या कामचुकारपणामुळे खड्डय़ात जात आहेत. परंतु त्याची तमा न पालिका अधिकाऱ्यांना ना सत्ताधारी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीला.