बुधवारी सकाळी ९ ची वेळ, अचानक पालिकेचे कर्मचारी अवतरले, पाण्याच्या पिंपात औषधे टाकण्यात आली, धूम्रफवारणी करण्यात आली, डेंग्यूबाबत उपाययोजनांची पत्रके वाटण्यात आली, त्याचबरोबर साफसफाईलाही वेग आला. पालिका कर्मचाऱ्यांची ही धावपळ सुरू होती ती ग्रॅन्टरोडच्या टोपीवाला लेन आणि आसपासच्या परिसरात. पालिका कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासांमध्ये हा परिसर लख्ख केला. तसेच डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृतीही केली. पण पाडकाम सुरू असलेल्या टोपीवाला लेन म्युनिसिपल शाळेचे राबीट मात्र तसेच पडून होते. या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्यास तेच कारणीभूत ठरले आहे.
टोपीवाला लेनमधील अंजली नंदकुमार सावंत यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतरही पालिकेकडून केवळ औपचारिकता म्हणून एकदाच कारवाई झाली. ‘डेंग्यूचा प्रादुर्भाव आणि पालिकेची उदासीनता..’ या मथळ्याखाली याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सकाळी ९ वाजता धूम्रफवारणी करणारा कर्मचारी टोपीवाला लेन परिसरात हजर झाला आणि त्याने धूम्रफवारणी केली. त्याच्या पाठोपाठ कीटकनाशक विभागातील कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी सर्व रहिवाशांच्या घरातील पाण्याच्या पिंपात अ‍ॅबीट औषध टाकले. काही कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव होत असला तर कोणती काळजी घ्यावयाची याबाबतची पत्रके वाटली. तसेच रहिवाशांची चौकशी करून हे कर्मचारी निघून गेले.
दरम्यान, या परिसरातील मोडकळीस आलेल्या टोपीवाला लेन म्युनिसिपल शाळेची इमारत पाडण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. पाडलेल्या भागाचे राबीट तेथेच पडून आहे. या राबीटमुळे अस्वच्छता झाली असून डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. पण पालिका अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. ‘ही इमारत पाच महिन्यांमध्ये पाडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण इमारत पाडून झाल्यानंतरच राबीट उचलण्यात येईल’, असे ठेकेदाराने रहिवाशांना सांगितले. परिणामी आणखी दोन महिने रहिवाशांना साथीच्या आजाराच्या सावटाखाली राहावे लागणार आहे.