नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणारी मुंबई महानगरपालिका स्वत मात्र जबाबदारी निभावण्यास अजूनही सज्ज नाही. ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ अभियान बारगळल्यानंतर पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची पालिकेची इच्छा कितीही चांगली असली तरी स्वतहून पुढाकार घेऊन ओला, सुका कचरा वेगळा करणाऱ्या नागरी सोसायटय़ांमधील कचरा एकाच ट्रकमधून डिम्पग ग्राउंडवर एकाच ठिकाणी टाकला जातो. ही परिस्थिती नजिकच्या काळात बदलण्यासाठी पालिकेकडे सध्यातरी कोणतीही योजना नाही.
ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत पालिकेकडून गेली आठ-दहा वष्रे धडे दिले जात आहेत. दक्षिण मुंबईतील ‘ए’ वॉर्डमधील काही सोसायटय़ांनी तसा पुढाकार घेऊन ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सुरुवातही केली होती. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसेच सुका कचऱ्यातून पुनर्वापराचे सामान बाजूला काढून उर्वरित कचरा डिम्पग ग्राउंडमध्ये योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. सुरुवातीला काही दिवस ए वॉर्डमधील सोसायटय़ांनी स्वत खतनिर्मिती सुरूही केली. झीरो गारबेज सोसायटी म्हणून त्यांचा गौरवही झाला. मात्र पालिकेकडून कोणताही पुढाकार घेतला गेला नसल्याने काही काळाने ओला, सुका कचऱ्याची मोहीम थंडावली.
स्वच्छता अभियानाअंतर्गत पुन्हा एकदा ओला-सुका कचरा विलग करण्याच्या मोहिमेने उचल घेतली आहे. मालाड येथील नगरसेवक विनोद शेलार यांनी पुढाकार घेऊन स्थानिक सोसायटय़ांमध्ये कचरा वेगळा करण्यासाठी रहिवाशांना सहभागी करून घेतले. हा कचरा टाकण्यासाठी वेगळ्या रंगांच्या कुंडय़ा वापरल्या जाव्यात ही त्यांची मागणीही प्रशासनाने मान्य केली नाही. मात्र खरी अडचण तर पुढेच असल्याचे आता लक्षात आले आहेत. सर्व मुंबईत ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सूचना देणाऱ्या प्रशासनाकडे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही योजनाच नाही. स्थायी समिती बठकीत भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे हे सत्य उघडकीस आणले. सोसायटय़ांमधून वेगळा गोळा करण्यात आलेला कचरा एकाच ट्रकमधून वाहून नेला जातो. किमान या कचऱ्याचे वेगळ्या प्रकारे विघटन करून किमान कचरा डिम्पग ग्राउंडवर राहण्यासाठी पालिकेने प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र सर्व कचरा साठवण्यापलिकडे पालिका काहीच करत नाही. त्यामुळे डिम्पग ग्राउंडची क्षमता लवकर संपुष्टात तर येतेच शिवाय पर्यावरणाचीही अपरिमित हानी होते. मात्र पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती पसरवणाऱ्या पालिका प्रशासन स्वत मात्र हे धडे घ्यायचे विसरले आहे. ओला व सुका कचरा वेगळा वाहून नेण्याची तसेच त्यांची वेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावण्याची कोणतीही योजना पालिकेकडे नाही, असे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी स्थायी समितीतच मान्य केले. या कचऱ्याबाबत पालिकेकडे अजूनही कोणतीही व्यवस्था नाही.
क्रशरही पडून..
रस्त्यांवर झाडांचा पडलेला पाचोळा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी पालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करून क्रशर विकत घेतला होता. या क्रशरमधून पानांचे बारीक तुकडे होऊन लवकर विघटन होण्यास मदत होते. मात्र ही यंत्रे भायखळ्याच्या राणीबागेत अजूनही पडलेली आहेत व रस्त्यावरील सर्व पालापाचोळा डिम्पग ग्राउंडमध्ये जातो.