चिरीमिरी दिल्याशिवाय कामे होत नसल्याचा नागरिकांना अनुभव येत असल्याने पालिका कार्यालयांतून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी बुधवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दक्षता जनजागृतीविषयक शपथ दिली. निमित्त होते ते दक्षता जनजागृती सप्ताहाचे.
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी, तसेच भ्रष्टाचाराच्या समुळ उच्चाटनासाठी केंद्रीय दक्षता आयोगाने २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्याचे आदेश शासकीय व निमशासकीय कार्यालयांना दिले आहेत.  यावेळी अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, एस.व्ही.आर. श्रीनिवास, विकास खारगे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) किरण आचरेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स, सॅप प्रणाली, ई-ऑफिस, डिजिटलायझेशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती सीताराम कुंटे यांनी यावेळी दिली. पालिकेच्या २४ प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरी सुलभीकरण पद्धत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त झाला आहे. विभाग अधिकारी, खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.