रस्त्यांची अथवा अन्य कामे करताना कंत्राटदार सुरक्षिततेची काळजी घेत नसल्यामुळे अपघात होतात आणि त्यात सामान्य नागरिक जखमी होतात. अशा नागरिकांना कंत्राटदारांकडून मदत मिळवून देण्यासाठी धोरण आखावे आणि कामांची पाहणी करण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
माहीम जंक्शन येथे रस्त्याचे काम सुरू असून खड्डय़ात अडखळून दुचाकीवरून जाणारे एक दाम्पत्य खाली पडले. पतीला किरकोळ जखम झाली. मात्र पत्नी गंभीर जखमी झाल्याने तिला प्रथम भाभा रुग्णालयात आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. ही महिला आजही कोमात आहे. या महिलेवर शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांची गरज आहे. है पैसे गोळा करण्यासाठी तिचा पती माहीम चर्चच्या बाहेर मदत मागत फिरत आहे, अशी माहिती देऊन काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया म्हणाले की, कंत्राटदाराने खोदलेल्या रस्त्याभोवती बॅरिकेड लावले असते तर हा अपघात टळला असता. या प्रकरणाची चौकशी करून कामचुकार कंत्राटदाराविरुद्ध कडक कारवाई करावी.
पालिकेचे कंत्राटदार सुरक्षेचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे अधूनमधून असे अपघात घडतात आणि नागरिक जखमी होतात. काम सुरू असलेल्या ठिकाणी अभियंते फिरकत नाहीत, त्यामुळे कंत्राटदारांचे फावते. त्यामुळे अपघातग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पालिकेने ठोस धोरण आखावे, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी या वेळी केली.
या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच संबंधित कामाच्या निविदेमधील अटी तपासून कंत्राटदाराकडून अपघातग्रस्तांसाठी नुकसानभरपाई वसूल केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

कंत्राटदारांना चाबकाचे फटके मारा..
रस्त्यांची कामे सुरू असतात तेव्हा जलवाहिन्या फुटतात आणि त्याचा थेट फटका मुंबईकरांना बसतो. अभियंते कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करतात आणि कंत्राटदार दंडाची रक्कम भरून मोकळे होतात. कंत्राटदारांना वेसण घालण्यासाठी आता दंडात्मक कारवाईऐवजी चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावणे गरजेचे बनले आहे. तरच ते वचकून काम करतील, असे संदीप देशपांडे यांनी या वेळी सांगितले.