विदर्भातील जलाशयात लवकरच होडय़ांच्या शर्यती आणि शिडांच्या नावांचा थरार अनुभवायला मिळेल, असे संकेत कयाकिंग, रोईंग व कॅनाईंगचे आंतरराष्ट्रीय ज्युरी आणि माजी राष्ट्रीय खेळाडू दत्ता पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या कयाकिंग, रोईंग व कॅनाईंग या जलक्रीडा प्रकारामुळे सतत पाण्याच्या संपर्कात असणाऱ्या मच्छिमारांच्या मुलांना व आदिवासी तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
सैन्यदल, निमलष्करी दल आणि पोलिस दलात कयाकिंग, रोईंग आणि कॅनाईंगची स्वतंत्र पथके आहेत. विदर्भात जलक्रीडा मात्र अजूनही पायडल बोटपुरतेच मर्यादित आहे. रामटेकमधील खिंडसी तलाव भारताच्या जलक्रीडा केंद्राच्या नकाशावर आहे. या जलाशयावर होडय़ांच्या शर्यतीचे जुजबी प्रयत्नही झाले, पण स्पर्धात्मक पातळीवर हा जलक्रीडा प्रकार रुजवता आला नाही. विद्यापीठ स्पर्धामध्ये कयाकिंग आणि कॅनाईंगचा समावेश आहे. मात्र, त्यासाठी लागणारे परिश्रम, द्यावा लागणारा वेळ आणि महागडय़ा उपकरणांच्या उपलब्धतेमुळे कुणीही हा जलक्रीडा प्रकार विदर्भात रुजवायला तयार नाही. याउलट मराठवाडय़ात या जलक्रीडा प्रकाराचे प्रचंड औत्सुक्य असून, मराठवाडय़ातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हा जलक्रीडा प्रकार लोकप्रिय आहे. विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात नद्या, कालवे, तलावांची संख्या पाहता या जलक्रीडा प्रकाराला मोठा वाव असूनही याची पायाभरणी अद्याप झाली नाही. या खेळासाठी लागणारे साहस आदिवासी मुलांमध्ये भरपूर आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी तरुणांना या जलक्रीडा प्रकाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर या खेळात महाराष्ट्रात चमकलेले दत्ता पाटील यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. दीड ते दोन वर्षांपूर्वी त्यांनी येथील जलाशयांची पाहणी केली होती.
नागपूर, अमरावती, हिंगोली, भंडारा या ठिकाणी जलाशयांची संख्या चांगली आहे. नागपूर परिसरातील रामटेकजवळचा खिंडसी तलाव, कुंवारा भिवसेन, फुटाळा, झिल्पी, सालईमेंढा आदी जलाशये या जलक्रीडा प्रकारासाठी अतिशय योग्य आहेत. त्यापैकी कुठून तरी एका ठिकाणाहून सुरुवात करावी लागेल. त्यासाठी मध्यभारतातील सीएसी ऑलराउंडर या साहसी उपक्रम राबवणाऱ्या संस्थेकडे या जलक्रीडा प्रकारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचे सहकार्य घेण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले. विदर्भात कागदोपत्री अनेक संस्था आहेत, पण असे उपक्रम राबवण्याकडे त्यांचा कल नाही. संस्था आपल्या ताब्यात कशी राहील, यासाठीच ते प्रयत्नशील असतात, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. पर्यटन व साहस एवढय़ापुरतेच प्रशिक्षण मर्यादित न ठेवता स्पर्धा पातळीवर विदर्भातील तरुण-तरुणींना प्रशिक्षित करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

पोहणे व शारीरिक तंदुरुस्ती हवीच
नौदल आणि तटरक्षक दलात याचे विशेष महत्त्व असून आपत्ती व्यवस्थापनात प्रचंड मोलाची भूमिका हा जलक्रीडा प्रकार बजावत आहे. त्यासाठी पोहणे आणि शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक महिन्यांच्या सरावानंतर वल्हे फिरवण्याची कला शिकता येते. एक किलोमीटर, पाच किलोमीटर, दहा किलोमीटर, असा सराव त्यासाठी करावा लागतो.