नवी मुंबई पालिकेच्या एप्रिल महिन्यात होणारी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्यापूर्वी अभियंता विभाग आणि नगरसवेक यांच्या संगनमताने अनेक बोगस नागरी कामांचा सुळसुळाट शहरात सुरू झाला असून चांगली गटारे, रस्ते, पदपथ तोडून त्या जागी नवीन बांधण्याची जणू काही स्पर्धा सुर आहे. ऐरोली सेक्टर सातमधील हा प्रकार नागरिकांनी उघडकीस आणला असून त्याची चौकशी करण्याची मागणी नवीन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई पालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. त्याची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरी कामे उरकून घेण्याची घाई लागली आहे. ही कामे करण्यामागे दुहेरी हेतू नगरसेवकांचा आहे. यात नागरी कामे केल्याचे श्रेयदेखील लाटता येते आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या लक्ष्मीदर्शनाची व्यवस्थाही या कामातून केली जाते. माजी पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी नगरेसवकांच्या या नागरी कामांना काही प्रमाणात चाप लावला होता. त्यामुळे ७०० ते ८०० फाइल्स मंजुरीच्या प्रतीक्षेत होत्या. नवीन आलेले आयुक्त दिनेश वाघमारे यांना ही कामे लवकर मार्गी लावावीत यासाठी गळ घातली जात आहे. काही नगरसेवक आयुक्तांच्या दालनाबाहेर सकाळी मुख्यालय सुरू होण्याच्या अगोदर येऊन बसत आहेत. नागरी कामांसाठी इतका आग्रह पाहून आयुक्त या कामांना मंजुरीदेखील लवकर देत आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी नागरी कामांचा बंपर सोडत निघाली आहे. त्यात आयुक्त या कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता अभियंता विभागाने दिलेल्या अहवालावर विश्वास ठेवून संमती देत आहेत. पालिकेचा अभियंता विभाग आणि नगरसेवक यांचे साटेलोटे गेली अनेक वर्षांचे आहे. त्यात आयुक्तांनी २५ लाख रुपये खर्चाच्या कामांचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे अभियंत्याची होळीमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. नगरसेवकाने सांगायचे आणि अभियंत्याने ऐकायचे असा सर्व मामला असून निवडणुकीच्या तोंडावर भरमसाट कामांची यादी निघाली आहे. त्यासाठी एका आठवडय़ात दोन स्थायी समिती महासभा घेण्याचा पराक्रम सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावला आहे. ऐरोली सेक्टर सातमध्ये अजय सोसायटीच्या समोर सुस्थितीत असलेले गटार तोडून नवीन गटार बनविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अशाच प्रकारे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या समोर पदपथ काढून त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. गटार पुनर्बाधणीच्या कामात गटाराचे सर्व काम समाविष्ट असताना केवळ वरून मुलामा लावला जात आहे. ही कामे निविदेत नमूद केल्याप्रमाणे झाल्याचा अहवाल देण्यास अभियंता एका पायावर तयार आहेत. त्या बदल्यात त्यांचेदेखील हात ओले होत असल्याने हा पुनर्निर्माण करण्याचा कारभार सध्या संपूर्ण शहरात सुरू असून वाशी येथे माजी आयुक्तांनी नाकारलेला सेक्टर दोनमधील हायमास्ट ऐन निवडणुकीच्या काळात लावण्यात आला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांत नागरी कामांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली जात आहे. नगरसेवकांना दोन्ही फायदे करून देण्यासाठी अभियंता विभागाने जणू काही कंबर कसली असून शहरात बोगस कामांचा सुळसुळाट झाला आहे. कंत्राटदारांचे देण्यास पैसे नाहीत अशी स्थिती पालिकेची आहे. त्यात स्थानिक निधी खर्चावर लेखापरीक्षण विभागाचे साडेतीनशे आक्षेप आजही कायम असून निवडणुकीच्या काळात करण्यात आलेल्या कामांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामांना हिरवा कंदील देणारे अधिकारी चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे. पालिकेच्या अभियंता विभागाचे प्रमुख शहर अभियंता मोहन डगांवकर व कार्यकारी अभियंता हरिश चिचारिया यांच्याशी यासंर्दभात संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.