आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात ‘पंचम निषाद’ संस्थेने आयोजित केलेला ‘बोलावा विठ्ठल’हा कार्यक्रम भक्तिरसात आणि रसिकांच्या प्रतिसादात रंगला. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. मुंबईपाठोपाठ दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जुलै रोजी हाच कार्यक्रम ठाण्यात गडकरी रंगायतन येथेही पार पडला.
षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गायिका देवकी पंडित, शास्त्रीय संगीत गायक जयतीर्थ मेवुंडी आणि गायक शंकर महादेवन सहभागी झाले होते. या तिघांनीही केलेल्या ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराने संपूर्ण सभागृह विठूनामात तल्लीन झाले. शंकर महादेवन यांनी ‘गणनायक गणदैवताय, संत मीराबाई यांचे ‘बाजे रे मुरलिया’ हे भजन, अन्य काही अभंग सादर केले. देवकी पंडित यांनी ‘नाथा घरी माझा सखा पांडुरंग’, ‘ताटी ऊघडा ज्ञानेश्वरा’ आदी अभंग म्हटले तर मेवुंडी यांनी ‘विसावा विठ्ठल’, ‘राजस सुकुमार’, ‘सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा’ हे अभंग सादर केले. ‘बोलावा विठ्ठल’ या ‘कॉफी टेबल’ पुस्तकाचे प्रकाशन या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजया मेहता, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्तेकरण्यात आले. पुस्तकात वारकरी संप्रदाय, वारी, अभंगवाणी आणि पंढरपूर विषयक माहितीचे संकलन करण्यात आले आहे. ‘बोलावा विठ्ठल’चा पहिला कार्यक्रम दहा वर्षांपूर्वी मुंबईत झाला होता. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी ‘बोलावा विठ्ठल’चे प्रयोग झाले. ‘बोलावा विठ्ठल’ या पुस्तकातील माहितीसाठी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी पुस्तकाची मांडणी व सजावट केली आहे.

ठाण्यातही ‘बोलावा विठ्ठल’
‘बोलावा विठ्ठल’चा प्रयोग २७ जुलै रोजी ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. येथेही रसिक श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात गायिका रंजनी-गायत्री, जयतीर्थ मेवुंडी, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर हे सहभागी झाले होते. ‘माझं मन’, ‘विठ्ठल आवडी प्रेमभाव’ हे अभंग सादर केले. रंजनी-गायत्री यांनी ‘सखा माझा नारायण’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘विठोबा चला मंदिरात’ आदी गाणी/अभंग सादर केले. जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘पोटा पुरतं देई विठ्ठल’, ‘राजस सुकुमार’ हे अभंग म्हटले. मुंबईत व ठाण्यात झालेल्या ‘बोलावा विठ्ठल’च्या दोन्ही कार्यक्रमांना रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. गायकांनी सादर केलेल्या अभंगवाणीचे शब्द आणि सूर मनात गुणगुणतच रसिक मार्गस्थ झाले.