ऐरोलीत सापडलेल्या बेवारस बॅगमुळे मंगळवारी परिसरात बॉम्बची अफवा पसरलीहोती. काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण परिसरात पसरल्याने एकच घबराट उडाली. घटनास्थळी तातडीने बॉम्ब शोधपथक आणि श्वानपथक दाखल झाले होते. तब्बल अडीच तासानंतर पथकाने बॅग उघडली असता, त्यात कपडे असल्याचेआढळून आल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. ऐरोलीतील सेक्टर तीनमधील जनता मार्केटमधील टिपटॉप फॅशन दुकानाजवळ एक बेवारस बॅग पडलेली असल्याची माहिती सकाळी १० च्या सुमारास एका नागरिकाने पोलीस कंट्रोल रूमला दिली. ही माहिती तातडीने रबाले पोलिसांना दिल्यानंतर बिटमार्शल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बॅग उचलून पाहिली असता ती जड असल्याने त्यात बॉम्ब असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी बॉम्बविरोधी पथक आणि श्वानपथक दाखल झाले. बॅग उघडल्यानंतर त्यात शेरवाणी, सलवार, कुर्ता आदी कपडे मिळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोरजे यांनी दिली.