महापालिका मुख्यालयासमोरील व्यापारी संकुलातील सुयोजित बिल्डर्सच्या कार्यालयात बॉम्बसदृश्य वस्तु पाठवत घबराट पसरविण्याचा प्रयत्न उघडकीस आला. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्यावर तातडीने ही वस्तु ठेवलेला बॉक्स खाली नेण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बॉक्सची तपासणी केली असता त्यात प्लास्टिक बाटलीत पेट्रोल, बॅटरी व वायर असल्याचे निष्पन्न झाले. बांधकाम व्यावसायिकांमधील अंतर्गत संघर्षांतून हा प्रकार केला गेला की त्यामागे अन्य काही कारणे आहेत याची छाननी पोलीस यंत्रणा करत आहे. या बॉम्बसदृश्य वस्तुंची तपासणी करण्याची प्रक्रिया तासभर सुरू होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शरणपूर रस्त्यावरील पालिका मुख्यालयासमोर सुयोजित ट्रेड सेंटरसह अनेक व्यापारी संकुले आहेत. बँका, वित्तीय कंपन्या, रुग्णालय व कार्यालये असणाऱ्या या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच इमारतातील दुसऱ्या मजल्यावर बांधकाम व्यावसायिक अनंत राजेगावकर यांचे सुयोजित बिल्डर्स हे कार्यालय आहे. साधारणत: दुपारी दीड वाजेच्या सुमारास कार्यालयातील कर्मचारी भोजन करण्यासाठी एकत्र बसले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्ती कुरिअर घेऊन आल्याचे सांगून संशयास्पद बॉक्स कार्यालयात ठेवून निघून गेला. काही वेळाने कार्यालयात निवावी दुरध्वनी आला आणि त्यावरून साहेबांना बॉक्स दिला की नाही, तो उघडून पाहिला काय, अशी विचारणा केली. या ठिकाणी कार्यरत माजी लष्करी अधिकाऱ्याला संशय आला. त्यांनी बॉक्सची पाहणी केली असता संशयास्पद वाटल्याने तडक तो तळमजल्यावर नेण्यात आला. दरम्यानच्या काळात पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांच्यासह बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
संकुलातील आसपासची दुकाने बंद करून हा परिसर मोकळा करण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बॉक्सची तपासणी केली तेव्हा त्यात १२५ मिलीलीटर पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत भरलेले होते. त्याच्या शेजारी बॅटरी, वायर आणि सर्कीटही जोडलेले असल्याचे निदर्शनास आले. प्रथमदर्शनी हा बॉम्ब असल्याचे भासत होते.
तथापि, चौकशीत ही निव्वळ बॉम्बसदृश्य वस्तु असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी हा बॉम्ब नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस यंत्रणेने हा सर्व संशयास्पद वस्तु ताब्यात घेतल्या असून अधिक चौकशीसाठी त्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बॉम्बसदृश्य वस्तु बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पाठविणे, संबंधिताने तो बॉक्स उघडून पाहिला की नाही याची दुरध्वनीवरून खातरजमा करणे या घटनाक्रमामागील कारणांबद्दल वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. या घटनेची माहिती समजल्यावर राजेगावकर यांनी कार्यालयात धाव घेतली. परंतु, नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळले. कार्यालयात बसविलेल्या सीसी टीव्हीचे चित्रण ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताचा शोध घेण्यास त्याचा उपयोग होईल असे सांगण्यात आले. दरम्यान, नाशिक शहर व परिसरात मालमत्तेच्या किंमतींमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. या घटनेमागे मालमत्तेशी संबंधित काही वाद अथवा स्पर्धा असे काही कारण आहे काय यासह वेगवेगळ्या दृष्टीकोनातून या घटनेचा तपास केला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.