नैसर्गिक साधनसंपत्ती, जैवविविधता, पर्यावरण समतोल अशा विषयांवर बरीच चर्चा होत असते. मात्र, या चर्चेत सहभागी होणारे अनेक घटक आपल्या सभोवतालच्या पर्यावरण आणि जैवविविधतेविषयी अनभिज्ञ असतात. आपल्या सभोवतालचे पर्यावरण आणि निसर्गाची ओळख आजच्या पिढीला समजेल अशा सहज सोप्या भाषेत करून देण्याचा प्रयत्न निसर्गमित्र विश्वरूप रहा यांनी केला आहे. जिल्ह्य़ातील पक्ष्यांची विविधता, त्यांची परिपूर्ण माहिती आदींचा समावेश असणारे ‘बर्डस ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट- अ कन्झर्वेशन गाइड’ हे रहा यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. जिल्ह्य़ातील पक्ष्यांची अनोख्या पद्धतीने माहिती देणारे हे बहुधा पहिलेच पुस्तक ठरेल.
जिल्ह्य़ात पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे. या ठिकाणी हिवाळ्यातील चार महिने देश-विदेशातील विविध पक्ष्यांचा मुक्काम असतो. या कालावधीत पक्षिनिरीक्षणासाठी निसर्गप्रेमींसह पक्षिमित्र मोठय़ा  संख्येने जात असतात. मात्र आवड, छंद आणि अभ्यास या तिन्ही पातळीवर पक्षिमित्रांना मार्गदर्शकपर कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. शहर परिसरातील मोजक्या पक्षिमित्रांचे मार्गदर्शन आणि गाइडची साथ यावर पक्षिनिरीक्षणांचा डोलारा उभा आहे. पक्षिनिरीक्षणात येणाऱ्या अडचणी, आवश्यक माहिती याबाबत पर्यावरणप्रेमींसह साऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशातून ‘बर्डस ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट’ या पुस्तकाची निर्मिती झाली. पक्षिमित्र सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत औपचारिकरित्या त्याचे प्रकाशन झाले. मात्र जानेवारी महिन्यात हे पुस्तक वाचकांना उपलब्ध होणार आहे.
साधरणत: अडीच वर्षांहून अधिक काळ या पुस्तकाच्या निर्मितीसाठी लागला आहे. रहा यांनी लिहिलेल्या, संकलित केलेल्या ४०० पानी पुस्तकांत लक्षवेधी छायाचित्रांच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील २५०हून अधिक पक्ष्यांची ओळख करून देण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये पक्ष्यांच्या अधिवासाप्रमाणे जंगल, गवतीमाळ व पाणथळ असे वर्गीकरण केल्याने पक्षिनिरीक्षकाला सुलभतेने त्या त्या परिसरातील पक्ष्यांची माहिती मिळते. पुस्तक इंग्रजीतून असले तरी त्यात प्रत्येक पक्ष्याची माहिती त्याच्या नावासहित इंग्रजीबरोबर मराठीतूनही करून दिली आहे. पुस्तकातील प्रत्येक चित्र जिल्ह्य़ातील असून ते कोठे व कधी घेतले याची नोंद त्यावर आहे. या शिवाय, प्रत्येक पक्ष्याच्या सामान्य नावाबरोबर त्याचे शास्त्रीय नाव, त्याचा आकार, तो स्थानिक आहे की स्थलांतरित, तसेच त्याचा आढळ सामान्य, क्वचित की दुर्मीळ, त्याच्या विशिष्ट लकबी यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील कुठल्या भागात तो आढळतो याबाबत नकाशावर नोंद करत शासकीय स्तरावर त्याचे वर्गीकरण कुठल्या गटात केले आहे या माहितीचा अंतर्भाव पुस्तकात आहे.
पक्षिनिरीक्षण कसे करावे याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नसते. ही बाब लक्षात घेऊन पक्षिनिरीक्षण करताना खबरदारी काय घ्यावी, पक्ष्यांची रंजक माहिती, विविध पक्षांच्या प्रजातींची ठळक वैशिष्टय़े, नकाशा, पक्षी सूची, संस्थेने दोन दशकांत शहरी तसेच ग्रामीण भागांत केलेले संवर्धन व जनजागृतीचे काम, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सहली, पक्षिनिरीक्षणाबद्दलची माहिती यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. रहा व त्यांचे सहकारी अजित बर्जे यांनी पुस्तक एक मार्गदर्शक किंवा तांत्रिक साच्यात न बसता पर्यावरणाचा खऱ्या अर्थाने जागर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. अशा विषयावर प्रसिद्ध होणारे हे बहुध पहिलेच पुस्तक आहे. पुस्तकासाठी इच्छुकांनी ९४२०८९१७१८ या क्रमांकावर संपर्क  साधावा, असे आवाहन नेचर कॉन्झर्वेशन संस्थेने केले आहे.