छेडखानीप्रकरणी मारहाण केल्याने संतापून टोळक्याने एका तरुणाचे अपहरण केल्याचा प्रकार नागपुरात भरदुपारी घडला. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाझरी पोलिसांनी तातडीने त्या तरुणाची सुटका केली.

अक्षय हनुमंत बत्तुलवार (रा. सुदामनगरी) हा राजा धनेश्वर शाहू व सिद्धार्थ पाटील हे तिघे दुपारी अंबाझरी तलावासमोर  ठेल्यावर नास्ता करीत होते. तेवढय़ात तेथे एक टोळके आले. त्यातील एका आरोपीने अक्षयला चाकूचा धाक दाखविला आणि जबरदस्तीने अ‍ॅक्टिव्हावर बसविले आणि हे टोळके निघून गेले. अवघ्या काही वेळातच घडलेल्या या घटनेने अक्षयचे मित्र हादरले. त्यांनी लगेचच अंबाझरी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी टोळक्याचा शोध सुरू केला. यातील एक आरोपी काचीपुरा झोपडपट्टीमधील असल्याचे समजताच पोलीस तेथे पोहोचले.

टोळक्याने अक्षयला काचीपुरा झोपडपट्टीमागील झुडपात घेऊन गेले. तेथे त्याला जबर मारहाण केली आणि डांबून ठेवले होते. काही वेळातच पोहोचून पोलिसांनी त्याची सुटका केली. शैलेश उर्फ बंटी विनोद हिरणवार, शक्ती राजेश यादव, रवि अशोक ठाकूर, साहिल दिलीप शेंद्रे, करण राजू ठाकरे (सर्व रा. काचीपुरा झोपडपट्टी) यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. आरोपी करण ठाकूर याने काही दिवसांपूर्वी अक्षयच्या बहिणीची छेडखानी केली होती. त्यामुळे संतापून अक्षयने रविवारी मारहाण केली होती. त्यामुळे इतर साथीदारांसह त्याचे अपहरण केल्याचे करणने पोलिसांना सांगितले. करणच्या इतर साथीदारांचीही नावे पोलिसांना समजली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.