मागील वर्षभरापासून रखडेल्या बीपीसीएल ते ओएनजीसीदरम्यानच्या बीपीसीएलच्या घरगुती गॅस भरणा प्रकल्पाच्या नव्या गॅस पाइपलाइन संदर्भात नवी मुंबई पोलिसांनी मध्यस्थी करून बीपीसीएल व्यवस्थापन तसेच प्रकल्पग्रस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांचा समेट घडवून आणल्याने प्रकल्पग्रस्तांचा विरोध मावळला आहे. गॅस पाइपलाइनवर धोकादायकरीत्या वसविलेल्या झोपडय़ा स्वत:हून हटविण्याची तयारी झोपडपट्टीवासीयांनी दाखविल्याने शुक्रवारपासून रखडलेले गॅस पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले आहे.
पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी ओएनजीसी प्रकल्पातून घरगुती गॅसपुरवठा करण्यासाठी बीपीसील प्रकल्पापर्यंत टाकण्यात आलेल्या साडेसात किलो मीटरच्या पाइपलाइनपैकी दीड किलो मीटरची पाइपलाइन ग्रामस्थांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या या मागणीसाठी वर्षभरापासून अडवून ठेवली होती. या संदर्भात न्हावा शेवाचे साहाय्यक पोलीस साहाय्यक आयुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी बीपीसील व्यवस्थापन व प्रकल्पग्रस्तांमध्ये मध्यस्थी करून तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. यासाठी नवनिर्वाचित आमदार मनोहर भोईर यांनीही पुढाकार घेतला. बीपीसीएल व्यवस्थापनाने मान्य केल्यानुसार प्रकल्पग्रस्तांना कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू करून घेतल्याने प्रकल्पग्रस्त शांत झाले होते; परंतु काम सुरू झाल्यानंतर कोणाचाही अडथळा नको यासाठी पोलीस यंत्रणेने दक्षता म्हणून कामाच्या ठिकाणी मोठय़ा संख्येने पोलीस कर्मचारी तैनात ठेवले होते.