विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता वेळ मिळावा म्हणून नववी-दहावीचे वर्ग दुपारच्या सत्राऐवजी सकाळी भरविण्याच्या खार रोड येथील बीपीएम हायस्कूलच्या निर्णयामुळे सध्या पालक आणि शाळेच्या प्रशासनामध्ये वेगळाच वाद उफाळून आला आहे. कारण, नववी-दहावीचे वर्ग सकाळच्या सत्रात भरणार असल्याने आतापर्यंत सकाळच्या वेळेत भरणारे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग शाळेला दुपारी भरवावे लागणार आहेत. परंतु ही वेळ काही पालकांना सोयीची नसल्याने त्यांनी शाळेच्या प्रशासनाविरोधात वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे.
वास्तविक खारमधील सोळावा रस्ता इथल्या या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मध्यम व निम्न आर्थिक वर्गातील विद्यार्थी बहुसंख्येने आहेत. आतापर्यंत या शाळेतील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दुपारी १२.५० ते सायंकाळी ५.४५ या वेळेत भरत असत. त्यानंतर शाळा दहावीच्या विद्यार्थ्यांची तयारी करवून घेण्यासाठी एक तास अधिकचा घेत असे. हे वर्ग पुढे ६ ते ७ वाजेपर्यंत चालत, परंतु ७ वाजेपर्यंत विद्यार्थी शाळेतच राहिला तर तो घरी जाऊन काय अभ्यास करणार? त्यातून सर्वच विद्यार्थी सकाळी लवकर उठून अभ्यास करणारे असतातच असे नाही. त्याऐवजी सकाळच्या वेळेस वर्ग भरल्यास दुपारी दोन-अडीचपर्यंत जादाचा वर्ग घेऊन या विद्यार्थ्यांना घरी सोडता येईल. दुपारी थोडीफार विश्रांती घेऊन त्यांना सायंकाळी अभ्यासाला वेळ मिळेल, या सकारात्मक हेतूने शाळेच्या संस्थेच्या सचिव गौरी देशपांडे यांच्या सूचनेवरून शाळेच्या समितीने बैठक घेऊन नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याला पाचवी, सहावी, सातवी, आठवीच्या काही पालकांचा जोरदार विरोध असून त्यांनी शाळेच्या विरोधात असहकाराचे धोरण स्वीकारले आहे.
शाळा आतापर्यंत पाचवी, सहावी, सातवी, आठवीचे (पाच वर्ग) वर्ग सकाळी ७.१० ते १२.३० या वेळेत भरत होते, तर आठवीचे उर्वरित चार वर्ग दुपारच्या सत्रात घेतले जातात. परंतु आता दुपारची शाळा केल्यास सकाळी मुलांना शाळेत सोडून कामावर जाणाऱ्या पालकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे अशा पालकांनी शाळेच्या बदललेल्या वेळांना विरोध करणे सुरू केले आहे. या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देवधर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालकांना विश्वासात घेऊनच वेळेत बदल केला असल्याचा खुलासा केला. त्याबद्दल आम्ही गेल्या वर्षीपासूनच पालकांना सूचित करीत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांचीही कैफियत
महत्त्वाचे नववी-दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठीही सकाळची वेळ सोयीची आहे. पूर्वी शाळेत शिकविणारे अनेक शिक्षक आजूबाजूच्या परिसरात राहणारे होते. त्यांना ७ वाजता शाळा सुटून घर गाठणे तितकेसे त्रासदायक ठरत नसे. परंतु आम्हा जवळपास सर्वच नव्या शिक्षकांना विरार, कल्याण, डोंबिवली असा दूरदूरचा प्रवास करून रात्री घर गाठावे लागते. कारण आम्ही सायंकाळी एक तास जादा घेतो. ७ वाजता शाळा सुटल्यानंतर घरी पोचायलाच आम्हाला १० ते ११ वाजतात. त्यातून पाचवी ते सातवीचे वर्ग नववी-दहावीच्या तुलनेत लवकर सुटतात. त्यामुळे त्या शिक्षकांना इतका उशीर होत नाही जितका आम्हाला होतो, अशा शब्दांत एका शिक्षिकेने आपली कैफियत मांडली.
नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता जादा वेळ मिळावा याच हेतूने वेळा बदलण्यात आल्या आहेत, तसेच लहान मुले सकाळच्या सत्रात झोप पूर्ण न झाल्याने बऱ्याचदा वर्गात पेंगत असतात. त्यांच्यासाठी दुपारची वेळ सोयीची नाही का? आज जे पालक दुपारच्या शाळेला विरोध करीत आहेत, त्यांची मुले नववी-दहावीत येतील तेव्हा त्यांनाही या वेळांचा फायदाच होणार आहे. त्यातूनही ज्या पालकांना दुपारच्या वेळेने गैरसोय होणार आहे, त्यांच्या पाल्यापुरता वेगळा वर्ग करून तो सकाळी घेण्याची तयारी आम्ही पालकांच्या बैठकीत दर्शविली होती. यापेक्षा अधिक आम्ही काय करावे, असा प्रश्न त्यांनी केला.
-अंजली देवधर, मुख्याध्यापिका, बीपीएम स्कूल