माहुल खाडीत तेलगळतीनंतर हाती घेण्यात आलेली स्वच्छता मोहीम सहा महिन्यांनतरही पूर्ण झाली नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई पोर्ट ट्रस्टकडून आरंभी जमा केलेली ५० लाख रुपयांची बँक हमी परत करण्यास नकार दिला आहे. त्याचसोबत आणखी ५० लाखांची बँक हमी भरण्यास सांगितले आहे.
समुद्रातील तेलविहिरीतून तेलशुद्धीकरण कारखान्यात तेल घेऊन येणाऱ्या वाहिन्यांमधून ऑक्टोबर महिन्यात तेलगळती सुरू झाली. स्थानिक लोक व मच्छिमारांनी तक्रार करूनही मुंबई पोर्ट ट्रस्टकडून त्याची दखल घेतली गेली नाही. तेलगळतीचे प्रमाण वाढल्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याचे संकेत दिले. सुमारे महिन्याभरानंतर पोर्ट ट्रस्टने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना कामाला लावून किनाऱ्यावरील खडकांवर पसरलेले तेल गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र पोर्ट ट्रस्टकडे योग्य यंत्र व कुशल कामगार नसल्याने ७०० टन पसरलेले तेल बाजूला करण्याचे काम अतिशय संथ गतीने व अव्यवस्थितपणे होत आहे. मातीमध्ये पसरलेले तेल वेगळे करण्यासाठी रासायनिक प्रक्रियांची आवश्यकता आहे. मात्र पोर्ट ट्रस्टकडून सरसकट तेल असलेली माती काढली जात आहे. या तेलगळतीमुळे सुमारे ३० एकर परिसरातील खारफुटीवर परिणाम झाला आहे.
सहा महिन्यानंतरही ५० टक्केही काम पूर्ण झाले नसल्याने मुंबई पोर्ट ट्रस्टने दिलेली २५ लाख रुपयांची बँक हमी परत न करण्याचा निर्णय एमपीसीबीने घेतला आहे. याचसोबत पुढील तीन महिन्यात काम पूर्ण करण्याची सूचना देऊन आणखी ५० लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय तेलगळतीच्या समस्येवरील उपाय म्हणून २४ तास लक्ष देणारी ‘टायर वन’ यंत्रणा उभी करण्याचे कामही अजून झाले नसल्याने २५ लाख रुपयांची बँक हमी परत दिली जाणार नाही. याशिवाय या कामासाठी अतिरिक्त ३७ लाख रुपयांची हमी जमा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
तेलगळती झाल्यानंतर आवश्यक ती उपाय योजना न केल्याबद्दल विविध त्रुटी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. बँक हमी अजून जप्त करण्यात आलेली नाही. मात्र मंबई पोर्ट ट्रस्टने वेळेत काम पूर्ण न केल्याबद्दल तसेच उपाययोजना राबवण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल हमी जप्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी राजीव वसावे यांनी दिली.