तंबाखूमुळे होत असलेल्या तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असतानाच स्तनाच्या कर्करोगानेही इशारा देण्यास सुरुवात केली आहे. स्त्रियांना होत असलेल्या या आजाराचे प्रमाण मुंबईत जास्त आढळून येत आहे. या कर्करोगाचे कारण अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाही. मात्र लवकर निदान झाल्यास हा कर्करोग बरा होतो.
भारतात सुमारे ३० लाख नागरिकांना कर्करोग आहे. त्यात दरवर्षी ९ ते १० लाख नवीन रुग्णांची भर पडत आहे. निदान करण्याची साधने अद्ययावत झाल्यानेही कर्करोग लक्षात येण्याचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग झालेल्यांपकी १० ते १५ टक्के रुग्णांना मुखाचा कर्करोग असतो व त्यातील सुमारे ८० टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन असल्याचे अनेक पाहण्यांमधून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकीकडे तंबाखूविरोधातील जनजागृती सुरू असतानाच दुसरीकडे स्तनाच्या कर्करोगाची धोक्याची घंटाही वाजू लागली आहे. शहरी, उच्चवर्गीय स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येणाऱ्या या आजाराचे प्रमाण वाढत आहे.
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावर पूर्ण उपचार करता येतात. मात्र कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही कर्करोग पसरण्याची शक्यता आहे. मानेपर्यंतच्या भागातील, स्तन तसेच गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची लक्षणे फारशी आढळत नाहीत, त्यामुळे नियमित तपासणी करून घेणे हाच मार्ग आहे, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. कीर्ती चढ्ढा यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात मेट्रोपोलिस प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये मुखापेक्षाही स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. मेट्रोपोलिसकडे आलेल्या १५,३४५ नमुन्यांपकी ११५१ नमुन्यांमध्ये कर्करोग असल्याचे आढळले. त्यातील २१४ म्हणजे १८.५ टक्के नमुने स्तनाच्या कर्करोगाचे होते. त्याखालोखाल १६६ रुग्णांना रक्ताचा कर्करोग तर ११४ रुग्णांना मुख कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. गर्भाशय मुखाचा कर्करोग असलेल्या ७५ स्त्रिया या पाहणीत आढळल्या. निम्न आíथक गटात मुख आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असते. मुखाच्या कर्करोगासाठी तंबाखू जबाबदार धरला जातो. गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी अस्वच्छता, वारंवार होणारा संसर्ग अशी कारणे दिली जातात.