डोंबिवली ते ठाणे अंतर अर्धा ते पाऊण तासाने कमी करणारा, शिळफाटा, भिवंडी वळण रस्त्याला फाटा देऊन थेट ठाणे गाठता येणारा डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव (रेतीबंदर) ते माणकोली या खाडी दरम्यानच्या एक किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाच्या निविदा प्रक्रियेला ‘महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने’(एमएमआरडीए) सुरुवात केल्याने या पुलाच्या कामाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. ‘एमएमआरडीए’च्या संकेतस्थळावर या निविदा प्रक्रियेचा तपशील खुला करण्यात आला आहे.
 पंचवीस वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या उड्डाण पुलाच्या कामाचे सर्वेक्षण केले होते. राजकीय जुळवाजुळव आणि ठेकेदारांची गणिते ‘जुळण्यात’ अडचणी येत असल्याने काँग्रेस आघाडी सरकारने या महत्त्वाच्या उड्डाण पुलाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. कल्याणमधील कोनगाव (दुर्गाडी पूल) ते कांचनगाव (पत्रीपूल) दरम्यान सहा वर्षांपूर्वी दृष्टिपथात असलेला एक उड्डाण पूल ठेकेदारांच्या ‘डावांचे’ फासे योग्य रीतीने न पडल्यामुळे राष्ट्रवादीच्या एका बडय़ा नेत्याने हाणून पाडल्याची त्या वेळी चर्चा होती.
या बदल्यात दुर्गाडी ते शिळफाटा रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करण्याचा प्रस्ताव राज्यातील आघाडी सरकारने कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनावर दबाव टाकून मंजूर करून घेतला होता. या राजकीय घडामोडींचे चटके उड्डाण पूल न झाल्यामुळे आता कल्याणकरांना वाहतूक कोंडीच्या माध्यमातून बसत आहेत.  कल्याण, डोंबिवलीमधील वाढत्या वाहतूक कोंडीचा विचार करून कल्याणचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीतील मोठागाव (रेतीबंदर) ते माणकोली खाडीवरील उड्डाण पूल झाला पाहिजे म्हणून ‘एमएमआरडीए’चे तत्कालीन आयुक्त राहुल आस्थाना यांना गळ घातली. राज्य सरकारला या पुलाचे महत्त्व पटवून देण्यात आनंद परांजपे यशस्वी झाले. त्यामुळे शासनाने पहिल्या टप्प्यात या उड्डाण पूल कामाच्या आराखडय़ांसह २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
‘एमएमआरडीए’च्या अभियंत्यांनी या उड्डाण पुलाच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी हा पूल मार्गी लागावा म्हणून त्यावेळी पाठपुरावा केला होता. कल्याण-डोंबिवली पालिकेतील नगरसेवक व स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनीही हा महासभेत मांडलेला या उड्डाण पुलाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे.

पुलाचा फायदा काय?
1) डोंबिवली, कल्याणमधून ठाणे येथे जाण्यासाठी शिळफाटा, मुंब्रा रस्ता किंवा भिवंडी वळण रस्त्याने जावे लागते. माणकोली उड्डाण पूल झाल्यावर डोंबिवलीतील सर्वच वाहने या दोन्ही रस्त्यांनी न जाता डोंबिवली पश्चिमेतून रेतीबंदर रस्त्याने माणकोली पुलावरून पिंपळास, सरई, वेल्हे, अंजूर या गावाजवळून थेट मुंबई-नाशिक महामार्गाला जाऊन मिळतील. तेथून ती ठाणे येथे जातील. यापूर्वी शिळफाटा, भिवंडी वळण रस्त्याने ठाण्याला जाण्यासाठी जो पाऊण ते एक तास लागायचा. तेथे या उड्डाण पुलामुळे वाहने विनाअडथळा ठाण्यात अवघी २५ ते ३० मिनिटांत पोहचतील.
2) डोंबिवली पश्चिमेत सुमारे सव्वा दोन लाख लोकवस्ती आहे. विविध प्रकारची सुमारे ४० ते ५० हजार वाहने या भागात आहेत. यामधील बहुतांशी वाहने डोंबिवली पूर्वच्या दिशेने न जाता पश्चिम भागातून माणकोली उड्डाण पुलाने निघून जातील. त्यामुळे पूर्व भागावर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास साहाय्य होणार आहे.
3)ठाणे किंवा त्यापुढे जाणारा बहुतांशी नोकरदार प्रसंगी आपल्या खासगी वाहनाने आपल्या कार्यालयात जाणे पसंत करील. सध्या भिवंडी, शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडी, टोल नाक्यावरील वाहनांनी गजबजलेला असल्याने कोणीही नोकरदार स्वत:चे वाहन या किचाटातून नेण्याचा विचार करीत नाही. त्या विचाराला नवीन पुलामुळे कलाटणी मिळेल.
4)माणकोली उड्डाण पुलाच्या परिसरात डोंबिवली खाडीकिनारी पेट्रोल पंप, सीएनजी गॅस केंद्र सुरू झाल्यानंतर पश्चिम भागातील रिक्षा इंधन भरण्यासाठी डोंबिवली पूर्वेत जाणार नाहीत.

पूल कसा असेल?
1) प्रस्तावित माणकोली उड्डाण पूल वरळी सी-लिंकप्रमाणे केबल सस्पेंशनप्रमाणे उभारण्यात येणार आहे.
2) या पुलाच्या डोंबिवली व माणकोली दिशेला किनाऱ्यावर फक्त एकेक पीलर उभारण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात या खाडीतून जलवाहतूक सुरू करायची असेल तर त्यात अडथळा नको हा प्रस्तावामागचा उद्देश आहे. या पुलाच्या माणकोली दिशेने सरई, वेल्हे, अंजूर या गावांच्या बाजूने दोन किलोमीटरचा नाशिक महामार्गापर्यंत दोन किलोमीटरचा पक्का रस्ता तयार करण्यात येणार आहे.
3) डोंबिवलीत रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाण पूल किंवा भुयारी रस्ता तयार करावा लागणार आहे. हा रस्ता पुढे एक किलो मीटपर्यंत पक्का करून पुलाला जोडण्यात येईल.

उड्डाणातील अडथळे
दोन वर्षांपूर्वी ‘एमएमआरडीए’ने या पुलाचा प्रस्ताव मंजूर करताच, डोंबिवली खाडीकिनारील सरकारी गुरचरण, सीआरझेड क्षेत्रातील जमिनींवर भूमाफियांनी चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी, भूमाफिया यांच्या संगनमताने ही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. पालिकेचा एक मोठा पदाधिकारी या सगळ्या व्यवस्थेत असल्याचे बोलले जाते. पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे, अनधिकृत बांधकाम नियंत्रणचे उपायुक्त सुरेश पवार यांचे या बांधकामांवर कोणतेही नियंत्रण नसल्याची टीका होत आहे. या पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर भूमाफिया, त्यांनी उभारलेल्या चाळी, तेथील रहिवासी पुलाला पोहोचणारा रस्ता तयार करताना अडथळे आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोपर, मोठागाव, रेतीबंदर, ठाकुर्ली ते मोहनेपर्यंत गेलेल्या २१ किलोमीटरच्या रिंगरूटला भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा विळखा टाकलाच आहे.

१५ जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रिया
मोठागाव ते माणकोली उड्डाण पुलाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर या प्रक्रियेची शेवटची तारीख असली तरी ही तारीख १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पुलाचे आराखडे यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कामांना सुरुवात करण्यात येईल, असे ‘एमएमआरडीए’चे कार्यकारी अभियंता चिवाणे यांनी सांगितले.