शहरात निवडणुकीचे वातावरण, चर्चा आणि माहोळ ज्या पद्धतीचे होते, त्या पाश्र्वभूमीवर उत्तर नागपूर मतदारसंघातील मतमोजणीचा कल जाणून घेण्यासाठी सकाळी ८ वाजता काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहचलेल्यांना कधी डॉ. माने तर कधी बसपाचे गजभिये यांचे पारडे जड होत असल्याचा रोमांच अनुभवयाला मिळाला. मतमोजणीच्या फेऱ्या जशा पुढे सरकत होत्या तशी उपस्थितांची उत्कंठा देखील वाढत होती.
काटोल मार्गावर दोन ठिकाणी दोन मतदारसंघांची मतमोजणी होती. यामुळे मॉईल कार्यालय ते ऊर्जा विभागाचे प्रकाश भवन यादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. या मार्गावर वाहनांची ये-जा बंद होती. मतमोजणी कक्षात केवळ उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जात होता. माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एका वेगळ्या खोलीत व्यवस्था करण्यात आली होती.
मतमजोणीला प्रारंभ होण्यापूर्वीच भाजपच्या बाजूने कल राहिले असा अंदाज बहुतांश उपस्थितांचा होता तर काहींना हत्ती कमाल करेल असेही वाटत होते. त्याचे प्रत्यय काही मतमोजणीच्या काही फेरातच आला देखील. पहिल्या फेरीचा निकाल साडेनऊ वाजता जाहीर करण्यात आला. पहिल्या डॉ. माने पुढे आणि त्यामागे काँग्रेसचे नितीन राऊत होते. परंतु दुसऱ्या फेरीपासून काँग्रेसला दुसरा क्रमांक देखील राखता येत आले नाही. भाजप आणि बसपमध्येच खरी चढाओढ दिसून येत होती.
डॉ. माने पहिल्या दोन फेरीत पुढे असल्याने भाजपच्या गोटात उत्साह संचारला होता. बसपा दुसरा क्रमांक आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे चेहरे पडले होते. तिसऱ्या फेरीत बसपचे किशोर गजभिये यांना  माने पेक्षा १३७३ मत अधिक पडली आणि बसपचा हत्ती किमान उत्तर नागपुरात चालू लागल्याचा आनंद बसप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता. परंतु हा उत्साह फार काळ टिकला नाही. लगेच पुढील दोन्ही फेरीत माने यांनी आघाडी घेतली. सहाव्या फेरीत मात्र माने यांच्या पेक्षा गजभिये यांना ४२१६ मत अधिक मिळाली आणि हत्तीच्या जीवात जीव आला. सोबतच उत्तर नागपुरात धक्कादायक निकाल लागेल आणि पहिल्यांदा बसप येथे आपले खाते उघडेल, अशी चर्चाही रंगू लागली होती. हे चित्र मतमोजणी केंद्राचे असताना बसपचे उमेदवार किशोर गजभिये येथे पोहचले. काहींनी त्यांना मीडिया केंद्रात येण्याची विनंती केली. ते तिकडे गेले आणि पत्रकारांचे स्वागत स्वीकारले. काहींनी तर त्यांना प्रतिक्रिया देण्याची विनंती केली परंतु केवळ तीन हजारची आघाडी म्हणजे फार होत नाही. पूर्ण निकाल येऊ द्या, त्यानंतर प्रतिक्रिया देतो म्हणून मतमोजणी कक्षात निघून गेले.
त्यानंतर नवव्या फेरीचा निकाला आला. हत्तीची चाल या फेरीत देखील सुरू होती. दहाव्या फेरीत मात्र भाजपने पुन्हा उचल खाल्ली आणि ३०५७ मतांची बसपची आघाडीला मागे टाकत ४९६ मतांची बढती घेतली. त्यानंतर पुढील सर्व फेऱ्यांमध्ये कमळ खुलत राहिला आणि डॉ. मिलिंद माने यांचा विजय निश्चित झाला.