बहुजन समाज पक्ष राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढणार असून त्यातील पंचवीस जागा यावेळेस हमखास जिंकणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी खासदार वीर सिंह आणि अ‍ॅड. सुरेश माने यांनी संयुक्तपणे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी विदर्भातील १३ उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली. उर्वरित यादी येत्या तीन दिवसानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
निवडणुकीदरम्यान बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विदर्भात दहा ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. आतापर्यंत बसपच्या पदरात एकही विधानसभेची जागा पडली नसली तरी येणारी निवडणूक जिंकण्यासाठी लढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या भाजपवरून लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन भाजप पूर्ण करू शकली नाही. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बसपने आपले उमेदवार उभे केले नव्हते. तर स्वतंत्र उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. ती एक रणनीती होती. २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये बसपचीच सत्ता येईल, असेही वीर सिंह यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विदर्भातील पहिली १३ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये नागपूर उत्तर- किशोर गजभिये, नागपूर दक्षिण- सत्यभामा लोखंडे, उमरेड- रुक्षदास बन्सोड, भंडारा- देवांगणा गाढवे, अर्जुनी मोरगाव-डॉ. भीमराव मेश्राम, तुमसर- नामदेव ठाकरे, वर्धा- नीरज गुजर, हिंगणघाट- प्रलय तेलंग, आर्वी- दादाराव उईके, धामणगाव रेल्वे- अभिजित ढेपे, तिवसा- संजय लवाडे, बुलढाणा- शंकर चौधरी आणि अकोला पूर्वमधून भानोदास कांबळे यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत समाजातील सर्वच घटकांना प्रतिनिधित्व देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
नागपूर उत्तर मधून उमेदवारी मिळालेले किशोर गजभिये यांनी अडीच महिन्यापूर्वी पार पडलेली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक फुले- शाहू- आंबेडकर परिषदेतर्फे लढवली होती. या निवडणुकीत त्यांना बसपने पाठिंबा जाहीर केला होता. त्यात त्यांनी दुसऱ्या पसंतीची मते प्राप्त केली होती. काँग्रेसचे उमेदवार प्राचार्य बबनराव तायवाडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीनंतर त्यांनी बसपमध्ये रितसर प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले उपस्थित होते.