येथील भगिनी मंडळ शाळेत शनिवारी तीळगूळ समारंभानिमित्त उपस्थित महिलांनी घरच्या घरी कचऱ्याचे विघटन करणाऱ्या पर्यावरणस्नेही टोपलीविषयी माहिती घेऊन एक प्रकारे कचरा निर्मूलनाची दीक्षाच घेतली. ठाण्यातील पर्यावरणप्रेमी जयंत जोशी यांनी घरच्या घरी ओल्या कचऱ्याचे विघटन करणारी पर्यावरणस्नेही टोपली विकसित केली आहे. या पर्यावरणस्नेही टोपलीच्या प्रात्यक्षिकासह त्यांचे व्याख्यान शाळेने आयोजित केले होते. त्याला शाळेतील शिक्षक, पालक तसेच परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. भगिनी मंडळ संस्थेने शाळेतील कचरा व्यवस्थापनासाठी तीन टोपल्या या वेळी विकत घेतल्या. 

जगातील सर्वाधिक बकाल देशांमध्ये भारताची गणना होते, कारण आपल्याला कचऱ्याचे नीट व्यवस्थापन करता येत नाही. आपल्या घरातला कचरा बाहेर नेऊन टाकणे एवढय़ावरच आपले व्यवस्थापन थांबते. मात्र त्यामुळे कचरा समस्या सुटत नाही. मुळात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने त्याचे विघटनच होत नाही. त्यामुळे सध्या मुंबई, ठाणे, पुणे आदी सर्वच महानगरांमध्ये कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. या सर्वच महानगरांमधील क्षेपणभूमींची (डम्पिंग ग्राऊंड) क्षमता संपली आहे. त्याठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिले आहेत. दरुगधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही दररोज हजारो टन कचरा वाहून नेऊन डम्पिंग ग्राऊंडवर जमा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता पुढाकार घेऊन ओला कचरा घराबाहेर न जाऊ देणे श्रेयकर ठरेल, असे मत जयंत जोशी यांनी व्यक्त केले. या प्लॅस्टिकच्या टोपलीतील जिवाणू ओल्या कचऱ्याचे नैसर्गिकपणे विघटन करून त्याचे खतामध्ये रूपांतर करतात. या प्रक्रियेत कोणतीही दरुगधी येत नाही. स्वयंपाकघरातील एका कोपऱ्यात ही टोपली राहू शकते.