पनवेलमध्ये स्वस्तात घरे देतो असे सांगून नुसत्या मोकळ्या शेतीच्या जागेवर आपल्या कंपनीच्या नावाचे फलक उभारून सुमारे २५० जणांकडून चार ते पाच लाख रुपये घेऊन फरार झालेला आर. के. बिल्डर म्हणजेच रुपेश कालगुडे याला वेळोवेळी पनवेल न्यायालयाने समन्स बजावूनही तो न्यायालयात हजर न राहिल्याने कामोठे पोलिसांनी अखेर रुपेशला पाटण तालुक्यातील त्याच्या गावाजवळून अटक केली आहे. सध्या रुपेश १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. रुपेशला अटक करण्याची पोलिसांची ही दुसरी वेळ आहे. सामान्य गुतंवणूकदारांचे सुमारे चार कोटी रुपये आर. के. बिल्डर प्रकरणात अडकले आहेत.
पनवेल तालुक्यातील सुकापूर (विमलगाव), नेरे, कोप्रोली येथे जागा दाखवून आर. के. बिल्डरने गुंतवणूकदारांकडून २००८ ते २००९ मध्ये लाखो रुपयांचे धनादेश स्वीकारले आहेत. कामोठे येथील सेक्टर सात येथे आर. के. बिल्डरने आपले कार्यालय थाटले. त्यामधील कर्मचाऱ्यांनी हे धनादेश पीडितांकडून स्वीकारले. रुपेश कालगुडे हा पूर्वाश्रमीचा कोपरखैरणे येथे कपडे विक्रीचा व्यवसाय करायचा. राजू चव्हाण या बांधकाम व्यावसायिकाच्या संपर्कात आल्यावर तो इमारत बांधकामाच्या व्यवसायात आला. या वेळी त्याला प्रणेत व प्रशांत हे सूर्यवंशी बंधू भेटले. त्यानंतर कामोठे येथे आर. के. बिल्डरच्या नावाने हा व्यवसाय सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईच्या गुंतवणूकदारांना स्वस्तात घरे मिळणार या उद्देशाने अनेकांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे.
कालगुडे याने अर्धवट पायाउभारणी करून सदनिकेचे पैसे उकळले. मात्र इमारत बांधली जात नाही याचा जाब विचारल्यावर टोलवाटोलवीची उत्तरे गुतंवणूकदारांना मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आर. के. बिल्डरच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मोठय़ा शिताफीने या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ रुपेश कालगुडे याला पकडल्यावर आता तरी आपले गमावलेले पैसे मिळतील अशी या प्रकरणातील पीडितांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. उलट रुपेश कालगुडे यांनी सर्वसामान्यांनी दिलेल्या रकमेतून काही जमिनी खरेदी केल्या व काही रक्कम आपले भागीदार सुर्यवंशी बंधू यांनी घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे सूर्यवंशी बंधूंविरोधातही गुन्हा दाखल केला. हे सर्व प्रकरण न्यायालयात सुरू असताना अजूनही कामोठे पोलिसांकडे पाच जणांनी आर. के. बिल्डरने फसवणूक केल्याची तक्रार मागील पंधरा दिवसांपूर्वी नोंदविल्याने या प्रकरणात अजून किती पीडित आहेत हेच पोलिसांना समजू शकले नाही. रुपेश हा पनवेलच्या न्यायालयात मागील अनेक महिन्यांपासून हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात फरारपत्र जाहीर केले. त्यानुसार कालगुडेवर कारवाई करणार असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे कामोठे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक टी. बी. माने यांनी सांगितले.