फराळ, फटाके, रांगोळी आणि नव्या कपडय़ांबरोबरच दिवाळीचा अविभाज्य घटक म्हणजे घराबाहेर मुलांनी बनविलेले मातीचे किल्ले. एरवी संगणकीय पडद्यावर ऑनलाइन विश्वात दंग असणारी मुले किल्ले बनविण्याच्या निमित्ताने का होईना मातीत हात घालतात. विशेष म्हणजे ठाण्यात विविध पक्ष, संस्थांच्या माध्यमातून किल्ले स्पर्धाचे आयोजन केले जात असल्याने आणि त्यात पारितोषिके मिळवण्यासाठी काल्पनिक आणि रेडिमेड किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यांची छोटी प्रतिकृती बनवण्याकडेच मुलांचा अधिक कल दिसून येत आहे. त्याचप्रमाणे किल्ल्यांची माहिती व्यवस्थित मिळवण्यासाठी किल्ल्यावर प्रत्यक्ष भेट देण्याबरोबरीनेच गुगल मॅप आणि इमेजेसच्या साहाय्याने किल्ला अधिक रेखीव व्हावा यासाठी बच्चे कंपनीकडून प्रयत्न होत आहेत.  
महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षिततेमुळे ढासळू लागले असताना या किल्ल्यांच्या इतिहासाची उजळणी विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या उद्देशाने सुरू झालेला ‘दिवाळीतील किल्ले’ बनवण्याचा उपक्रम अपुऱ्या जागांमुळे कमी होऊ लागला आहे. ठाण्यामध्ये मात्र विविध राजकीय पक्ष आणि संस्था किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून या उपक्रमांना बळ देत असल्यामुळे ठाण्यातील विविध सोसायटय़ांच्या परिसरात किल्ले बनवण्यामध्ये रममाण झालेले विद्यार्थी दिसतात. त्यातही रेडिमेड अथवा काल्पनिक किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे.
ठाण्यातील बी केबिन येथील कलावती भवन परिसरातील श्री विनायक स्पोर्ट क्लबच्या १६ मुलांनी ५ दिवसांमध्ये राजगड साकारला असून त्यासाठी या मुलांनी थेट राजगड गाठले. तेथील दुर्गकलेची पुरेपूर माहिती या विद्यार्थ्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे किल्ला हुबेहूब साकारण्यासाठी या विद्यार्थ्यांनी गुगल मॅप, आणि गुगल इमेजवरून या किल्ल्याच्या नकाशाची छायाचित्रे घेऊन त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांनी करून घेतला. राजगडची संजीवनी माची, सुवेळा माची, पद्मावती माची आणि बालेकिल्ला याची परिपूर्ण माहिती घेऊन येथील मुलांनी हा किल्ला साकारला आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी या मुलांनी किल्ला साकारला असून या देखण्या किल्ल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आहे. किल्ल्याची ओळख करून देणारे छोटे माहितीपत्रक लावण्याबरोबरच या विद्यार्थ्यांनी येथे येणाऱ्या प्रत्येकाला किल्ल्याची परिपूर्ण माहिती देण्याचीही व्यवस्था केली आहे.

किल्ल्यासाठी माती मिळेना..
ठाणे शहरामध्ये किल्ला बनवणे मोठे जिकिरीचे असून किल्ल्यासाठी लागणारी माती या भागामध्ये मिळणे खूपच कठीण होऊन बसले आहे. येऊर, घोडबंदर परिसर आणि लोकमान्यनगर भागामध्ये शहरातील विविध भागांतून विद्यार्थी मातीसाठी धडकतात. तसेच किल्ल्यासाठी लागणारे दगड मिळत नसल्याने काँक्रीटचे तुकडे, विटांचे तुकडे घेऊन विद्यार्थ्यांना ते वापरावे लागत आहेत. किल्ला बनवताना या गोष्टी जुळवून आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते, अशी माहिती राजगड साकारणारे निशांत शर्मा यांनी दिले.  
किल्ल्यांच्या दिवाळीसाठी प्रोत्साहन..
शहरातील अपुऱ्या जागांमुळे दिवाळीतील किल्ला संस्कृती कमी होऊ लागली असली तरी ती वाढवण्यासाठी आणि मुलांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे, डोंबिवलीतील विविध संस्था किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करतात. या स्पर्धाना प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाण्यातील राज्याभिषेक समारोह संस्था आणि ठाणे शिवसेनेच्या वतीने अनेक वर्षांपासून किल्ले बांधणी स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी विद्यार्थी अत्यंत कलात्मक किल्ले बनवतात.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…