शेतमाल खरेदी केला नसताना बनावट पावत्या बनवून पैशांचा घोळ केल्याच्या ‘कथित’ प्रकरणी तीन आडतदार व्यापारी व त्यांना सहाय्य करणाऱ्या मालेगाव बाजार समिती सचिवांविरूध्द फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी अलका केल्हे व अनिता केल्हे या दोन खरेदीदार परवानाधारक व्यापाऱ्यांनी चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती खालावली आहे.
विक्री झालेल्या शेतमालानुसार शेतकऱ्यांना आधी आडते रक्कम देत असतात.आडतदारांना खरेदीदार व्यापारी ठराविक काळानंतर ही रक्कम देत असतात. त्या बदल्यात त्यांना विशिष्ट रक्कम आडत म्हणून मिळत असते. या प्रकरणात दोन्ही परवानाधारक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून जितका शेतमाल खरेदी केला त्यापेक्षा अधिक वेळा खरेदी केल्याचे भासवत तिघा आडत्यांनी त्यांच्याकडून जादा रक्कम घेतली. दहा लाखापेक्षा अधिक ही रक्कम असल्याचे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बनावट दस्तऐवजाकडे दुर्लक्ष करत समितीच्या सचिवांनी हा व्रिक्री व्यवहार खरा असल्यावर शिक्कामोर्तब करत या आडत्यांना बनावट प्रमाणपत्र दिले. त्यामुळे संगनमताने फसवणुकीचा हा प्रकार घडल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केला आहे. पणन संचालक व जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी तक्रार करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याची या महिलांची तक्रार आहे.
उपोषणकर्त्यां महिलांची प्रकृती खालावल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आणि महिलांच्या नातेवाईकांनी बाजार समिती प्रशासक गौतम बलसाने यांची शुक्रवारी भेट घेतली.चर्चेत या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यासाठी जिल्हा निबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही प्रशासकांनी दिली.