मुसळधार पावसानंतर जिल्ह्य़ातील सहा सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असून इरई व चारगाव प्रकल्पावर पर्यटकांनी गर्दी केली असून मौजमस्तीचा आनंद लुटत आहेत. अन्य प्रकल्पांमध्येही जलसाठा वाढलेला आहे.
जून, जुलै व ऑगस्ट अक्षरश: कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये जिल्हाभरात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्य़ातील अकरा लघु व मध्यम प्रकल्प तुडुब भरले आहेत. इरई धरणातील जलसाठय़ातही वाढ होत असल्याचे बघून प्रशासनाने तीन दरवाजे रविवारी उघडले होते, परंतु मंगळवारी पावसाने उसंत घेताच या धरणाचे तिन्ही दरवाजे बंद करण्यात आले. सध्या हा प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे, तर दिना, लभानसराड, चंदई, चारगाव व नलेश्वर प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. चंद्रपूरकरांची जलदायनी असलेल्या इरई धरणात ९२.६३ टक्के जलसाठा आहे. त्यापाठोपाठ आसोलामेंढा ७९.८६, घोडाझरी ५२.९५, अंमलनाला ६५.९७, पकडीगुड्डम ५४.१७ व डोंगरगाव प्रकल्पात ७४.७० टक्के वाढ झाली आहे. सिंचन प्रकल्प तुडूंब भरल्याने पर्यटकांनी इरई व चारगाव धरणावर गर्दी केली आहे. शनिवार व रविवारी इरई धरणावर तर पाय ठेवायला सुध्दा जागा नव्हती. तिकडे आसोलामेंढा तलाव ८२ टक्के भरला असून तेथेही पर्यटक मौजमस्ती करण्यासाठी येत आहेत.
यंदा पावसाने तब्बल तीन महिने उशिरा हजेरी लावली. त्यातही आजवर तुरळक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्य़ातील शेकडो एकर शेतजमीन पडीक होती. राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती या तालुक्यात सोयाबीन व कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र, धानपट्टय़ातील सिंदेवाही, मूल, ब्रम्हपुरी, चिमूर, सावली, पोंभूर्णा तालुक्यातील भात रोवणीची कामे खोळंबली होती. परिणामत: या परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत सापडला होता. कधी ढगाळ वातावरण, कधी तुरळक पाऊस या निसर्गाच्या लहरी खेळात जगाचा पोशिंदा चिंतातूर झाला होता, पण गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने धानपट्टय़ातील तालुक्यात आता रोवण्यांना जोमाने सुरुवात झाली आहे. मात्र, सोयाबीन व कपाशी या पिकांवर हवामानातील बदलाचा परिणाम झाला असून त्यावर चक्रीभुंगा, पान खाणारी अळी, लष्करी अळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी कीटकनाशके घेऊनही या रोगांचा नायनाट होत नसल्याचे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
यंदा शेतकऱ्यांवर सुरुवातीपासून निसर्गाने वक्रदृष्टी टाकली. यंदाचा खरीप हंगाम उशिराने सुरू झाला. त्यामुळे उत्पादनात चांगलीच घट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पावसाअभावी खोळंबलेल्या रोवण्यांना आता एकदम वेग आला असून धान शेतकरी कामाला लागला आहे. तो सुखावला असला तरी कपाशी व सोयाबीनवर रोगांचे सावट आहे.