रस्ते दुरुस्ती, जलवाहिनी, मलवाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने विविध भागातील केबल मोठय़ा प्रमाणात खराब झाले आहे. तसेच पथदिवे दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने शहरातील अनेक वस्त्या काळोखात आहेत. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही समस्या ‘जैसे थे’ असल्यामुळे नागरिक त्रस्त  झाले आहेत.
पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील विविध भागात रस्ते दुरस्तीची कामे करण्यात आली. या शिवाय ओसीडब्ल्यूतर्फे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. या काळात अनेक ठिकाणी केबल खराब झाले, ते दुरस्त करण्यात आले नाही. शहरात पश्चिम, पूर्व आणि उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये ही समस्या आहे. या संदर्भात नगरसेवक आणि नागरिकांनी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे अनेकदा तक्रार करूनही प्रकाश पडला नाही. गेल्या आठवडय़ात जोरदार पाऊस झाला. अनेक झोपडपट्टी भागात पाण्याचे डबके साचले होते. त्यामुळे रस्त्यावरील पथ दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना त्या भागातून जाणे कठीण झाले. उत्तर नागपुरातील पिवळी नदी, नारा, संजय गांधी नगर या वस्त्यांमध्ये रस्त्यावरील पथदिवे गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याचे वस्तीतील नागरिकांनी सांगितले.  
शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती कंत्राटादारांमार्फत करण्यात येते. प्रत्येक झोनमध्ये एक कंत्राटदार असतो. रोजंदारी कामगार ठेवून कंत्राट पथदिवे दुरुस्तीचे काम करते. महापालिका निविदा काढून देखभाल व दुरुस्तीसाठी साहित्य खरेदी करते आणि कंत्राटदाराला ते पुरविण्यात येते.
पथदिवे दुरुस्ती सुमारे १० ते १२ कोटी रुपये दरवर्षी महापालिका खर्च करते. मात्र, रस्त्यावरील रात्रीचा काळोख काही दूर होत नाही. शहरात साधारणत: १ लाखाच्या जवळपास खांब असून तेवढेच पथदिवे आहेत. यातील ४ ते ५ टक्के पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी बंद असतात.
विशेषत: रिंग रोडवरील पथदिवे केबल खराब झाल्यामुळे बंद आहेत. रस्ता दुभाजकावरील तसेच, वस्त्यांतील अंर्तगत खांबावरील दिवे विशिष्ट अंतराने बंद असतात. यासंदर्भात तक्रारी केल्यावर तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते आणि नगरसेवकाने हस्तक्षेप केल्यानंतर दुरुस्ती झालीच तर फार तर काही दिवसात परत पथदिवे बंद पडून अंधार होतो. प्रत्येक दहा पथदिव्यांमागे तीन दिवे बंद पडलेल्याचे चित्र शहरात सर्वत्र सारखेच आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक वर्षांपासून पथदिवे दुरुस्तीचे कंत्राट एकाच कंत्राटादाराला दिले जाते. या कंत्राटदाराला महापालिका हॅड्रोलिक मशिन, टय़ूब लाईट, चोक, सॉकेट आदी साहित्य उपलब्ध करून देते.
या कंत्राटदाराला केवळ दुरुस्तीसाठी वर्षांला एक ते सव्वा कोटी रुपये दिले जातात. दुरुस्तीसाठी कंत्राटदार कित्येक दिवस वेळ मारून नेतो. अत्यंत मनमानी पद्धतीने कंत्राटदाराचा कारभार सुरू असतो. मात्र, कंत्राटदाराबाबत कनिष्ठ अभियंत्ये तक्रार करीत नाहीत, हे विशेष.