‘लिओपॉल्ड’च्या गल्ल्याजवळ होतो आणि काही कळण्याच्या आत स्फोट झाला आणि गोळय़ांच्या फैऱ्या झडू लागल्या, तिथल्या तिथे झोपलो आणि सुदैवाने समोर टेबल पडल्याने आडोशाच्या आधाराने वाचलो. जखमींच्या मदतीची धावपळ सुरू झाली होती. माझे कपडे रक्ताने माखलेले होते, बुटांतही रक्त गेल्याने पायही रक्ताने ओले झाले होते..आपण रक्ताने चिंब भिजलो आहोत ही जाणीव झाली आणि क्षणभर हादरूनच गेलो.. ‘लिओपॉल्ड कॅफे’तील २६ नोव्हेंबरच्या रात्रीची आठवण सांगताना तेथे वेटर म्हणून काम केलेल्या संदेश माळीचा आवाज आज चार वर्षांनंतरही थरकापत होता..

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची सुरुवात लिओपॉल्ड कॅफेपासून झाली. त्यावेळी कॅफेत वेटर म्हणून काम करणारे अब्दुल जलील, तुकाराम इळके, संदेश माळी, निलेश पाटील, प्रकाश गामोट हे पाचही जण थोडक्यात वाचले. कसाबची फाशी आज त्या थरकाप उडवणाऱ्या आठवणींवर समाधानाची फुंकर ठरली. ‘लिओपोल्ड कॅफेच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बारचा दरवाजा आम्ही प्रसंगावधान राखून बंद केल्यामुळेच किमान सव्वाशे लोकांचे प्राण वाचवता आले अन्यथा मृत्यूचा आकडा आणखी वाढला असता..’ या कॅफेमध्ये त्या रात्री कामावर असतानाच्या आठवणींनी निलेश पाटील आणि प्रकाश गामोट पुन्हा शहारले, पण लगेच सावरले.. कारण कसाब फासावर गेल्याच्या बातमीचे समाधान जास्त होते.. कसाबने दोन साथीदारांसोबत लिओपोल्डमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि एकच हाहाकार माजला.. अनेकजण ठार झाले होते, काहीजण जखमांच्या वेदनांनी विव्हळत होते. रस्त्यावर वाहनेही नव्हती आणि मदतीला कोणीच नव्हते. आम्हीच सगळ्या जखमींना मिळेल त्या वाहनाने सेंट जॉर्जमध्ये नेले.. तुकाराम इळके यांनी सांगितले.

‘त्या दोघांनी कॅफेच्या दरवाजातच हातबॉम्ब फेकला. पळापळ झाली. लगेच त्यांनी गोळीबार सुरू केला. मी आणि प्रकाश दोघेही हॉटेलच्या वरच्या भागात पळालो. तेथे असलेल्या बारचा दरवाजा आम्ही लावून घेतला. दरवाजाला आतून कडी नव्हती. एक टेबल खेचले आणि त्याने दरवाजा घट्ट अडवून धरला. त्यांनी खालूनच वरच्या खिडक्यांवर गोळ्या मारल्या. वर येऊन दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला पण त्यांना दरवाजा उघडता आला नाही,’ निलेश पाटीलने ती घटना आठवत सांगितले. दरवाजा उघडला गेला असता किंवा आम्ही आमचाच जीव वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर किमान सव्वाशे जणांचा बळी गेला असता, असे प्रकाशने सांगितले.

गोळीबार सुरू झाला तेव्हा अब्दुल जलील ‘ऑर्डर’ घेत होता. गोळीबाराचा आवाज ऐकताच त्याने धूम ठोकली. दहा मिनिटांनी सारे शांत झाल्यावर परत आला तर सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला, जखमी झालेले मदतीची विनवणी करत होते. ‘सेव्ह मी’, ‘हेल्प मी’ अशा आर्त हाका परदेशी पर्यटक देत होते. हे पाहून भेदरलेल्या जलीलला पीर पाशा व हिदायत काझी या त्याच्या दोन वेटर मित्रांचे रक्ताच्या थारोळय़ात निपचित पडलेले मृतदेह दिसले आणि तो पार कोसळला. पण क्षणांत सावरत जखमींच्या मदतीला धावला. कसाबच्या फाशीमुळे सारे आनंदित असले तरी त्यांच्या नजरेसमोर आधी येते ती रक्तरंजित कॅफेचे दृश्य!

(या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी www.youtube.com/loksattalive )