आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अधिकाधिक मतदारांनी नोंदणी करावी या करिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस अ‍ॅम्बॅसॅडर’ म्हणून नेमण्यात येणार आहे. अर्थात या दूतांचे कार्यक्षेत्र त्यांचे स्वत:चे महाविद्यालयच असणार आहे. मतदार यादीत नोंदणी न केलेल्या व आतापर्यंत कधीच मतदान न केलेल्या आपल्या सहाध्यायींनी आपला हक्क बजावावा यासाठी हे दूत काम करणार आहेत.
मुंबईत १८-१९ आणि २० ते २९ या वयोगटामध्ये मोठय़ा प्रमाणात मतदार नोंदणी झालेली नाही. मतदानाचा हक्क बजावण्याकरिता सर्वप्रथम मतदार यादीमध्ये नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याकरिता महाविद्यालयीन स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या करिता पुढाकार घेतला असून मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या मदतीने ही मोहीम फत्ते करण्याची योजना आहे.महाविद्यालयांमधील १८ वर्षांपुढील तरूण विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने मतदार नोंदणी करावी, हे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे. त्या करिता प्रत्येक महाविद्यालयातून दोन ते तीन विद्यार्थ्यांची ‘कॅम्पस अ‍ॅम्बॅसॅडर’ म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालय ज्या विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीमध्ये समाविष्ट आहे, त्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना या विद्यार्थ्यांची नावे कळविण्यात येतील. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राचार्य किंवा प्राध्यापक यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. मतदार नोंदणीचे अर्ज जमा करणे, मतदार ओळखपत्र तयार झाल्यानंतर त्याचे वाटप करणे याची जबाबदारीही संबंधित महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे. जी महाविद्यालये पात्र विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात यशस्वी ठरतील, त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्राचार्यानीही या योजनेचे स्वागत केले आहे. अनेक महाविद्यालयांनी ही जबाबदारी आपल्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’चे समन्वयक प्राध्यापक आणि सहभागी विद्यार्थ्यांवर सोपविली आहे.

मतदार म्हणून निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. महाविद्यालयांचीही ही सामाजिक जबाबदारी असून तरूणांचा मतदार म्हणून सहभाग वाढविण्याच्या या मोहीमेचे आम्ही स्वागतच करतो.
प्रा. माधवी पेठे, प्राचार्य, डहाणूकर महाविद्यालय