एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियातर्फे घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. नागपुरातील बहुतांश कोचिंग क्लासेसनी फेररचित पॅटर्नचा अभ्यास सुरू केला आहे. प्रवेश परीक्षांसाठी शिकवावयाच्या अभ्यासक्रमांसाठी क्लासेसना आता नवीन पॅटर्ननुसार पावले उचलावी लागणार आहेत.
नीट परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने सर्वाधिक पंचाईत बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची झाली आहे. या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेस लावले आहेत. काही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांची संभ्रमित अवस्था स्पष्ट झाली. एक विद्यार्थिनी म्हणाली, परीक्षेसाठी अवघे पाच महिने उरले होते. आता आमचे परीक्षेचे नियोजनच कोलमडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा अनुकूल असल्याचे मत व्यक्त करून ही परीक्षाच रद्द केल्याने राज्य मंडळाचे विद्यार्थी मात्र आनंदी आहेत. या निकालामुळे राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यातच एमबीबीएसला प्रवेश मिळण्याचा मार्ग सोपा होईल, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. आकाश कोचिंगचे संचालक चंद्रकांत सतिजा यांच्या मते हा निकाल दुर्दैवी आहे. खरेतर नीट परीक्षा ही चांगली शैक्षणिक परीक्षा होती. परंतु, न्यायालयाच्या निकालावर लगेचच भाष्य करणे घाईचे ठरेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली असताना हा निकाल आल्याने त्यांची मनस्थिती अवघडल्यासारखी झाली आहे. परीक्षेचे नाव बदलल्याने परीक्षेचे पॅटर्न आणि तयारीत फारसा फरक पडणार नाही. नव्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांची तयारी करवून घेण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. नागपूरच्या मेडिकल कॉलेजचे औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वाय.व्ही. बनसोड यांच्यामते नीट परीक्षा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश चांगला होता. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. एकाच राष्ट्रीय परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश परीक्षेसाठी जाणे टाळता येत होते. सर्व राज्यांमध्ये परीक्षेचे स्वरुप एकसूत्री होते. त्यामुळे आता वेगळ्या प्रवेश परीक्षांचे कारण काय?, असा सवाल त्यांनी केला. डॉ. शशांक वंजारी यांच्या मते न्यायालयाचा निकाल अतिशय चांगला आहे. नीट परीक्षेमुळे विद्यार्थी संभ्रमित होत होते. त्याचा दर्जाही फारसा चांगला नव्हता.