नागपुरातील २८ टक्के महिलांना स्तनाचा कर्करोग झाला असून ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील ५५ ते ६० टक्के पुरुषांना तोंडाच्या कर्करोगाचा धोका असल्याचा निष्कर्ष इंडस हेल्थ प्लस आणि नागपूर स्कॅन सेंटरने संयुक्तरीत्या तयार केलेल्या निष्कर्षांत काढला आहे. या निष्कर्षांवरून नागपुरात कर्करुग्णांचे प्रमाण भरमसाठ वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी ४ फेब्रुवारीला ‘जागतिक कर्करोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जगभरातील विविध संघटना जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवत असतात.
इंडस हेल्थ प्लस आणि नागपूर स्कॅन सेंटर यांनी जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत नागपुरातील ९ हजार ३२१ पुरुष आणि ८ हजार ३२६ महिलांची तपासणी केली. त्यात हे प्रमाण आढळून आले आहे. उशिरा झालेली लग्ने आणि उतरत्या वयात झालेले मूल यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढत असल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले आहे. १३ ते १४ टक्के शहरी भागातील महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसून आली. ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले. नागपुरातील २५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण पिढीलाही कर्करोगाचा धोका आहे. महिला आणि पुरुष यांना पोटाच्या समस्या असल्याचे आढळून आले असून त्यांनाही कर्करोगाचा धोका आहे. ४५ ते ५० वर्षे वयोगटातील पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका आहे. या वयोगटातील २५ ते ३० टक्के व्यक्तींना प्रोस्टेट कर्करोगाच्या मूक लक्षणाची जाणीव नव्हती आणि ही लक्षणे केवळ वाढत्या वयाची लक्षणे आहेत, असे त्यांचा गैरसमज होता, असेही सर्वेक्षणात आढळून आले आहे.
तसेच ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील धूम्रपानाची आणि तंबाखू खाण्याची सवय असलेल्या ५५ ते ६० टक्के पुरुषांना मुखकर्करोग होण्याचा धोका असतो. त्यात ३० ते ३५ टक्के लोकांच्या छातीत समस्या असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा कर्करोग होण्याचा धोका ३ टक्क्यांनी वाढला आहे. ३९ टक्के पुरुष व ३३ टक्के महिलांमध्ये लठ्ठपणा आढळून आला आणि एकूण २९ टक्के लोकांमध्ये विविध कर्करोगांचा धोका दिसून आला. मद्यपान व बैठय़ा जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढीस लागला आहे. लठ्ठपणा, ताण, धुम्रपान यामुळेही कर्करोग होऊ शकतो, असेही या निष्कर्षांत म्हटले आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने आणि या आजाराबद्दल पुरेसे ज्ञान नसल्याने बहुतेकांना कर्करोग झाल्याचे दिसून आले, असे इंडस हेल्थ प्लसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमोल नाईकवाडी यांनी म्हटले आहे.
कर्करोगाचे उशिरा निदान झाल्याने यावर्षी भारतात ७० टक्के लोक दगावले. ८० टक्के रुग्ण आजार गंभीर अवस्थेला पोहोचल्यावर डॉक्टरकडे जातात. अशा वेळी रुग्ण बचावण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे कर्करोगाबद्दल आणि त्याला प्रतिबंध करण्याबद्दल जागरुकता निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
जगभरात दरवर्षी ९.५ दक्षलक्ष नागरिकांचा मृत्यू होतो. त्यातील ७ टक्के मृत्यू एकटय़ा कर्करोगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.