लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे सात दिवस बाकी असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारासाठी दिवस-रात्र एक करण्यास सुरूवात केली असताना मतदानाच्या दिवशी मतदानाची टक्केवारी नेमकी किती राहील याची सर्वाना धास्ती आहे. दिवसेंदिवस वाढणारा उष्मा आणि शाळांना लागलेल्या सुटय़ांमुळे गावी गेलेले नागरिक याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही भीती लक्षात घेऊन शहरातून गावी जाणाऱ्यांना २४ एप्रिलपर्यंत थोपविण्यासाठी उमेदवार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारांची मनधरणी करावी लागत आहे. 

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहा मतदारसंघात २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नाशिक शहरात वाढत्या औद्योगिकरणामुळे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागांसह बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमधील परप्रांतीय कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. उन्हाळ्यात ही सर्व मंडळी आपआपल्या गावांना परतण्यास सुरूवात होते. ग्रामीण भागातील नोकरदार हे मुलांच्या शाळांना सुटय़ा लागल्याने कधीच गावी जाण्यास सुरूवात झाली आहे. त्यातही विशेषत्वाने नोकरदार पुरूष हे कुटूंबास गावी सोडून पुन्हा नोकरीवर हजर राहण्यासाठी परतत असले तरी त्यांच्या घरातील एक किंवा दोन मत हमखास कमी होत आहे. सिडको, अंबड, सातपूर या भागात कामगारवर्गाची संख्या अधिक असल्याने त्या भागातील मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रचार पत्रकांचे वाटप करणाऱ्या मुलांच्या लक्षात ही गोष्ट सहजपणे येत असून अनेक घरांना कुलूप दिसत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. सटाणा, कळवण, मालेगाव, देवळा, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील कामगारांची संख्या या भागात अधिक आहे. एरवी या भागांमधील ज्या गल्ल्यांमध्ये गर्दीमुळे पायी चालणेही अवघड होते. त्या ठिकाणची रहदारी अत्यंत कमी झाल्याचे जाणवत आहे. हा सर्व शाळांना सुटय़ा लागल्याचा परिणाम आहे. प्रचार सभांमधील उपस्थितीवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे.
बहुतांशी परप्रांतीय कामगारही उन्हाळ्यात गावी परतू लागले आहेत. हे कामगार गावी जाण्यामुळे ज्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या कामगारांना थोपविण्यासाठी विविध प्रकारचे उपाय योजण्यात येत आहेत. २४ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर त्याच दिवशी दुपारनंतर गावी जाणाऱ्या परप्रांतीयांना थेट नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत पोहचविण्याची तयारीही काही उमेदवारांनी दर्शविली आहे. मतदारांनी मतदानाच्या दिवसापर्यंत गावी जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना अक्षरश: त्यांची विनवणी करावी लागत आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि मनसेचे डॉ. प्रदिप पवार यांच्यात अतिशय तीव्र लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत असल्याने एकेक मत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण झाले आहे. अर्थात या तिघांव्यतिरिक्त डाव्या आघाडीचे तानाजी जायभावे आणि बहुजन समाज पक्षाचे दिनकर पाटील, आम आदमी पक्षाचे विजय पांढरे यांची उमेदवारी कोणासाठी किती घातक ठरू शकते, यावर तीन प्रमुख उमेदवारांपैकी एकाचा विजय अवलंबून राहील. विशेष म्हणजे कामगारांची अधिक लोकसंख्या असलेल्या सिडको, अंबड, सातपूर या परिसरात जायभावे आणि दिनकर पाटील हे दोघे राहात असल्याने त्यांना बाहेर जाणाऱ्या कामगारांना रोखणे अत्यावश्यक झाले आहे.