महायुती आणि आघाडीतील बिघाडीच्या राजकारणामुळे विलंबाने सुरू झालेली प्रचाराची रणधुमाळी शीगेला पोहोचली असून गांधी जयंती, दसऱ्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि बकरी ईद अशा पाच दिवसांच्या सुट्टय़ांमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा चंग सर्वच उमेदवारांनी बांधला आहे. या काळात रोड शो, पदयात्रा, प्रवेशद्वार-सोसायटी बैठका, छोटय़ा चौक सभांचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे. मतदारसंघातील इमारतींचा आढावा घेऊन घरोघरी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांची विभागवार फौज सज्ज झाली आहे. काही पक्षांनी व्हॉटस्-अ‍ॅपवर मतदारांचे ग्रुप बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची क्लुप्तीही लढविली आहे.
शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित असल्यामुळे प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी विलंबाने जाहीर झाल्याने प्रचारासाठी कमी दिवस शिल्लक राहिले आहेत.  गांधी जयंतीनिमित्त गुरुवार, २ ऑक्टोबरला, दसऱ्यानिमित्त शुक्रवार, ३ ऑक्टोबरला, तर बकरी ईदनिमित्त सोमवार, ६ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी आहे. मध्ये शनिवार-रविवार येत असल्यामुळे गुरुवार ते सोमवार मतदार सुट्टीवर असणार आहेत. ही संधी साधून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. निवडणुकीचा प्रचार १३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. त्यामुळे आता अवघे १२ दिवस हातात आहेत. त्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाची माहिती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्हीजन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर टाकण्यात आली आहे. सुट्टीचा काळ असो वा नसो मतदारांपर्यंत पोहोचण्याचा दंडक शिवसैनिकांना घालून देण्यात आहे, असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले. सुट्टय़ांच्या काळात ठिकठिकाणी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘रोड शो’चे मोठय़ा प्रमाणावर आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे शुभेच्छापत्र आणि उद्धव ठाकरे यांचे व्हिजन घेऊन युवासैनिक प्रत्येक इमारतीमधील मतदारांपर्यंत पोहोचणार आहे.  नितीन पायगुडे, दिवाकर रावते, रामदास कदम, अमोल कोल्हे, आदेश बांदेकर आदी नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सुट्टय़ांच्या काळात  प्रचाराचा धडाका उडविण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी सांगितले. भाजप उमेदवारांनी घरोघरी पोहोचण्याबरोबरच चौक सभांवरही भर दिला आहे.  मोठय़ा संख्येने सोसायटी बैठकांचे आयोजन करून थेट मतदारांशी संपर्क साधण्याची योजना आहे.  मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. नवरात्रौत्सवाचा काळ असल्यामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट देऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले. उद्याने, मैदाने येथे व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सकाळी ६ ते ९ या वेळेत उमेदवार भेट घेत आहेत. रेल्वे स्थानकांवरही उमेदवार मतदारांना भेटत आहेत. आता सुट्टय़ांमुळे थेट मतदारांच्या घरी पोहोचण्यावर भर देण्यात येणार आहे. अधिकाधित मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल. प्रत्येक बूथ अध्यक्षाला ८०० ते १००० मतदारांचा व्हॉटस्-अ‍ॅपवर ग्रुप बनविण्यास सांगण्यात आले असून पक्षाचे संदेश आणि अन्य माहिती व्हॉटस्-अ‍ॅपद्वारे मतदारांपर्यंत पोहोचत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील यांनी सांगितले.

परीक्षेने तारले!
एवढय़ा सुट्टय़ा जोडून आल्याने मतदार बाहेरगावी जाण्याचीही धास्ती असते. यंदा मात्र दिवाळीआधीच्या परीक्षांचा मोसम सुरू होत असल्याने अनेक मतदार घरीच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांनी निवडणूक परीक्षेला तोंड देत असलेल्या उमेदवारांना प्रचारापुरते का होईना तारले आहे.