राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत (एमएसबीटीई) संलग्नता रद्द केलेल्या राज्यातील ३४ संस्थांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिये अंतर्गत (कॅप) प्रवेश न करण्याचे फर्मान तंत्रशिक्षण संचालकांनी काढले असून त्यात विदर्भातील १२ तांत्रिक संस्थांचा समावेश आहे.
मंडळामार्फत ठरवण्यात आलेल्या मानकानुसार वर्गवारी करण्यात आलेली आहे. मंडळाने केलेल्या तपासणीत संस्थांमध्ये काही आक्षेपार्ह, असमाधानकारक बाबी आढळल्याने कलम ३२नुसार संस्थांची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिये अंतर्गत तसेच संस्था स्तरावर प्रवेश होऊन त्यानंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवू नयेत म्हणून तंत्रशिक्षण विभागाने खबरदारी म्हणून त्या ३४ संस्थांमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबईतील एका संस्थेचा तर पुण्यातील पाच संस्थांचा त्यात समावेश आहे. औरंगाबादमधील सर्वात जास्त १६ तर विदर्भातील १२ संस्थांमध्ये ठराविक अभ्यासक्रमांना प्रवेश न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये वध्र्याचे संजीव स्मृती डीएमएलटी संस्था, नागपूरचे इंगोले इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिटय़ूट ऑफ होटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, वध्र्याचे अग्निहोत्री पॉलिटेक्निक, नागपूरचे भाऊसाहेब मुळक पॉलिटेक्निक आणि मुकुंदराव पानसे पॉलिटेक्निक, वध्र्याचे पुलगाव पॉलिटेक्निक आणि बाबुलालजी अग्निहोत्री तंत्रज्ञान संस्था, नागपूरचे ओम पॉलिटेक्निक कॉलेज, वध्र्याचे व्यंकटेश पॉलिटेक्निक, भंडाऱ्याचे सेवकभाऊ वाघाये पाटील पॉलिटेक्निक कॉलेज आणि बुलढाण्याचे राजश्री शाहू पॉलिटेक्निक आदींमधील ठराविक अभ्यासक्रमांना यावर्षी प्रवेश होणार नाहीत.
मंडळामार्फत संलग्न संस्थांपैकी पाच वर्षांच्या आतील संस्थांचे वर्षांतून दोनदा तर पाच वषार्ंवरील संस्थांचे एकदा बहि:स्थ शैक्षणिक निरीक्षण समितीमार्फत पाहणी केली जाते. शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय बाबींची पूर्तता याविषयीची शहानिशा करणे हा त्यामागचा उद्देश असतो. तपासणी केल्यानंतर त्यात असमाधानकारक बाबी आढळल्यास कलम ३२ अन्वये संस्थांची अंशत: किंवा पूर्णत: संलग्नता रद्द करण्याची तरतूद आहे. शैक्षणिक पाहणीकरता संस्थांनी स्वत:ची ऑनलाईन पद्धतीने माहिती भरली होती.
समितीने प्रत्यक्षात भेट दिली तेव्हा संस्थेने दिलेली माहिती व उपलब्ध माहितीत तफावत आढळून आली. याशिवाय काही विशेष अभिप्राय, विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचना आणि तक्रारींची नोंद समितीने घेतली. तपासणी करण्यात आलेल्या संस्थांची उत्कृष्ट, अतिशय चांगली, चांगली, समाधानकारक आणि वाईट अशी वर्गवारी करण्यात आली. त्या आधारावरच संस्थांतील जे अभ्यासक्रम आवश्यक मानकांची पूर्तता करीत नसतील त्यांची संलग्नता रद्द करून उर्वरित अभ्यासक्रम सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.