किशोर म्हात्रे : मल्लखांब हा खेळ असा आहे की या खेळाकडे आपल्याकडे खूप कमी लक्ष दिले जाते. ग्रामीण भागात राहत असल्याने माझ्यात तेवढा आत्मविश्वास नव्हता. पण शिक्षकांनी या खेळासाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला मल्लखांब काय आहे हे माहीतही नव्हते, जेव्हा तो खेळ पहिल्यांदा पाहिला, तेव्हा आपण हे करूच शकणार नाही, अशी भीती वाटली, पण शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे या खेळात नाव कमवू शकलो. विभाग, जिल्हा अशा स्पर्धा करत करत राज्य पातळीवर पोहोचलो आणि मल्लखांब या खेळात पहिल्यांदा ठाणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. मल्लखांब या खेळासाठी आमच्या गटाच्या माध्यमातून विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले. विद्यापीठासाठी मल्लखांब खेळणारा ठाणे जिल्ह्यातला पहिला मुलगा ठरलो.

पल्लवी लेले :    नृत्याची आवड घरातूनच निर्माण झाली. नृत्य प्रशिक्षण देणारी गुरू माझी आईच असल्यामुळे लहानपणापासूनच नृत्य पाहत आले. पण याच क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांकडून माझ्यावर कधीच दबाव आणला नाही. आई-बाबांनी माझी आवड ओळखून मला माझे क्षेत्र निवडण्यासाठी पुरेपूर प्रोत्साहन दिले. शाळेमध्ये असल्यापासूनच नृत्य करत होते, महाविद्यालयात आल्यावर कलेला जास्त वाव मिळाला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंघ, प्रा. मृण्मयी थत्ते यांनी खूपच सहकार्य केले. स्पर्धामध्ये भाग घ्यायला लागले, यूथ फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले, या सगळ्यातून आत्मविश्वास वाढत गेला. याच आत्मविश्वासामुळे दुबईला झालेल्या कल्चरल इंटरनॅशनल ऑलिम्पियाडसाठी गेले. आणि तिथे सुवर्णपदक मिळवले. मॉरिशिसच्या पंतप्रधानांसमोर कथ्थक सादर करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.

अनिरुद्ध  चटला     मला एक वेगळी ओळख बिर्ला महाविद्यालयाने दिली आहे. महाविद्यालयाच्या कला मंडळ परिवाराचा मी एक भाग असून शीतल चित्रे यांच्या प्रोत्साहनामुळे मी हा प्रवास करत आहे. पडद्यावरील सादरीकरणापेक्षा पडद्यामागील भूमिका याही खूप महत्त्वाच्या असतात. त्या सांभाळण्याचे काम मी केले आहे. यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच बदल झाला आहे, दुसऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, संयम पाळणे आदी गोष्टी माझ्यात आल्या आहेत. रंगमंचाच्या मागच्या जबाबदारी सांभाळणे हे खूप कठीण काम असले तरी शीतल चित्रे यांच्या सहकार्यामुळे ते उत्तमरीत्या सांभाळू लागलो आहे.

रियांका मिश्रा :   माझे जीवन एक आनंददायी आणि तितकाच सुखद धक्का देणारा प्रवास होता. शाळेमध्ये अनेक स्पर्धामध्ये भाग घेऊन बक्षिसे पटकाविली आहेत. महाविद्यालयात सिनिअर तुम्हाला सहसा सहकार्य करत नाहीत, असे ऐकले होते, मात्र मी आज जे काही आहे ते माझ्या सिनिअरच्या सहकार्यामुळेच. मी खरे तर वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे, परंतु कला मंडळाने मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. कला मंडळामध्ये आल्यानंतर मला कळले की आपले जीवन हे केवळ आपला परिवार, मित्र, नोकरी यापुरतेच सीमित नाही तर सोसायटी, राष्ट्र, राज्य या प्रतीही आपले असे कर्तव्य आहे. त्यानंतर माझ्यात खूप बदल होत गेला. शेवटच्या वर्षांला मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या यूथ फेस्टिव्हलमध्ये वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिथे यश संपादन केले. तर जोशी-बेडेकर महाविद्यालयाने विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा संसदीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. आणि मी एक वेगळा पायंडा पाडल्याचा अभिमान मला आहे. त्या स्पर्धेत मला माझ्या नावाने नाही तर महाविद्यालयाच्या नावाने ओळखले गेले. माझ्या महाविद्यालयासाठी मी काही तरी केले, यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही. सांस्कृतिक मंडळ माझे एक कुटुंबच झाले आहे. माझ्या स्वत:च्या जीवनात त्याचा खूप उपयोग झाला. आपल्याबरोबर दुसऱ्यांनाही आपण पुढे घेऊन जायला हवे हे मी शिकले. आज माझे ज्युनिअर मला बोलतात तुझ्यामुळे आम्ही पुढे आलो हे सर्वात मोठे बक्षीस आहे.

अंकित अगरवाल :     शाळेमध्ये मी चार भिंतींच्या आतच होतो, पण महाविद्यालयात आल्यावर माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या कक्षा रुंदावल्या. महाविद्यालयात आल्यावर मला संघटित काम काय असते ते कळले. मित्र, शिक्षक व पालक मला सहकार्य करतात. महाविद्यालयांत झालेल्या स्पर्धामध्ये भाग घेतला, त्यात अनेक बक्षिसे पटकाविली. नॅशनल इकोनॉमिक सेमिनारमध्ये माझ्या महाविद्यालयाचे मी प्रतिनिधित्व केले, त्यात पहिला क्रमांक मिळाला. शाळेत प्रत्येकाचे एक स्वप्न असते की आपले नाव व्हायला पाहिजे. हे नाव मला महाविद्यालयात गेल्यावर मिळाले. माझ्या मित्रांनी मला एकत्रितपणाचे महत्त्व काय असते हे दाखवून दिले. मिस्टर बिर्ला स्पर्धेत शिक्षकांनीच मला सांगितले की तू भाग घे.. तू करू शकतो. त्यांच्या व मित्रांच्या सहकार्याने मला ‘मिस्टर बिर्ला’ किताब मिळाला यात तुमचे व्यक्तिमत्त्व, सामाजिक बांधीलकी तपासली जाते. त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक झाला आहे. आता मी कोणाशीही मनमोकळा संवाद साधू शकतो.

अरुंधती देशपांडे :   तायक्वांडो हा खेळ वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी खेळत आले. शाळेमध्ये माझा खेळ विकसित झाला. शिक्षकांच्या आणि पालकांच्या सहकार्यामुळे मी सातवीतच गोवा येथे पहिली राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा खेळले. ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अचिव्हमेंट होती. तेथेच माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले. शाळा संपल्यानंतर कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा याविषयी मनात संभ्रम होता. महाविद्यालयात गेल्यावर खेळ बंद करावा लागेल, असेच ऐकायला येत होते. मात्र माझ्या मित्रमंडळींनी मला बिर्ला महाविद्यालयाचे नाव सुचविले. येथे तुझ्या खेळाला आणखी वाव मिळेल, असे समजल्यावर मी या महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रा. रोहित जाधव व इतर शिक्षकांच्या पाठिंब्याने मी स्पर्धासाठी संपूर्ण भारत देश फिरले आहे. खेळ ही अशी गोष्ट आहे की त्याने मला मी आयुष्यात काहीतरी वेगळे करू शकते हे दाखवून दिले.

संदेश पडवळ  :    शालेय जीवनात कधीही कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही. परंतु महाविद्यालयमध्ये प्रवेश करताच एका अभिनय शिबिरामध्ये भाग घेण्याचा योग आला. त्यानंतर अभिनयाची आवड निर्माण होत गेली. महाविद्यालयातील कला मंडळाच्या साहाय्याने अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला. एकपात्री सादरीकरणामध्ये बिर्ला महाविद्यालयामध्ये प्रथम पारितोषिक पटकावले, त्यानंतर विद्यापीठामध्ये ठाणे झोनमध्ये तिसरे बक्षीस मिळाले.

प्रणव आगाशे :   शाळेमध्ये असताना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे लिहिण्याची शैली सुधारत गेली. निबंध, वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेत अनेक बक्षिसे मिळवली. महाविद्यालयामध्ये कला मंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास वाढीस मदत झाली. बिर्ला महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या रोट्रॅक क्लबमध्ये जनसंपर्काचे काम पाहतो. अशा सर्व उपक्रमांमुळे भाषा, बोलण्याची लकब, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत झाली.

भाग्यश्री भोईर  :
वडिलांची रुची वेट लिफ्टिंगमध्ये असल्याने त्यांची इच्छा होती की, मी वेट लिफ्टिंगच करावे. परंतु काहीतरी वेगळं करण्याची उमेद मनात होती. काही काळ एनसीसीमध्ये व्यतीत केल्यानंतर हळूहळू रायफल शूटिंगमध्ये रुची वाढायला लागली. याच खेळात करिअर करायचं असं ठरवलं. बिर्ला महाविद्यालयाच्या सहकार्याने अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली.

योगेश मडवी :    कुस्ती हा खेळ लहानपणापासून आवडत होता. शाळेमध्ये स्पर्धेत भाग घेत असताना काही मर्यादा येत होत्या. त्यामुळे बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयाच्या मध्यमातून राज्य स्तरावून राष्ट्रीय पातळीवर जाण्याचा मान मला मिळाला. राष्ट्रीय स्पर्धेत विजयी होण्यासाठी माझा पुढील काळात प्रयत्न सुरू आहे.

अंजली सुरांजे :   पोलीस होण्याची इच्छा लहापणापासूनच होती. परंतु त्यासाठी लागणारी तालीम मला महाविद्यालयामध्ये एनसीसीच्या माध्यामातून मिळाली. एनसीसीच्या माध्यमातून अनेक कॅम्पमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. आरडीसी आणि आयडीसी परेड कमांडर म्हणून धुरा सांभाळण्याची संधी प्राप्त झाली, तसेच हे काम करताना उत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कारही मिळाला.

कांचन सकुंडे :    मुली नेहमी ज्या खेळ खेळतात त्यापेक्षा मला वेगळं काहीतरी करायचं होतं. म्हणून आधी मी कराटे शिकत होते, पण नंतर मला किक् बॉक्सिंगची आवड निर्माण झाली. किक् बॉक्सिंगचे प्रशिक्षण घ्यायला लागले. स्पर्धामध्ये भाग घेतला, राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवले आणि आता ‘एशियन चँपियनशिप’साठी माझी निवड झाली. या सगळ्यासाठी माझ्या प्रशिक्षकांचे खूप सहकार्य मिळाले.