लोकसभा निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान होत असून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्रातील कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप होत असताना जिल्हा निवडणूक शाखेचा गाफिलपणा वेळोवेळी अधोरेखीत झाला. मतदान साहित्याची देवघेव होत असतांना पोलिसांकडून कर्मचारी वा शिक्षकाला कोणतीही विचारणा होत नव्हती. मतदान केंद्र वाटप करणाऱ्या ठिकाणापर्यंत सहजपणे कोणीही अनोळखी व्यक्ती दाखल होत होती.
सकाळी नऊपासूनच विविध केंद्रांवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या हाती साहित्य देण्यास सुरूवात झाली. हे सर्व साहित्य एका छोटेखानी पेटीत बंद करण्यात आले होते. ज्या वेळी हे साहित्य कर्मचाऱ्यांच्या हातात देण्यात येत होते. त्या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा गलथानपणा दिसून येत होता. अशा ठिकाणी प्रवेश करणाऱ्या कोणाचीही पोलिसांकडून किंवा इतरांकडून चौकशी होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. केंद्रावर नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत होते. कर्मचाऱ्यांचे बूथनिहाय नियोजन नसल्याने मतदान साहित्य देव-घेव प्रक्रियेत विस्कळीतपणा आलेला होता. आपणांस कोणाकडून साहित्य ताब्यात घ्यायचे आहे याची चौकशी करण्यात अनेकांचा वेळ गेला. काही जणांना मिळालेल्या मतदान यंत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांना ती बदलून देण्यात आली. काही कर्मचाऱ्यांनी मतदार यंत्र ताब्यात घेतल्यानंतर निष्काळजीपणे ती कुठेही ठेवल्याचे आढळून आले. या निष्काळजीपणामुळे एखादे यंत्र गहाळ झाले असते तर, जबाबदार कोण असा प्रश्न उद्भवतो. साहित्य ताब्यात घेतल्यानंतर बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून कोणतीही चौकशी होत नव्हती. म्हणजेच केंद्रात कोणीही या, साहित्य घेऊन जा असा प्रकार सुरू होता.