देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी येथे कामगार व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत सायकल व मोटरसायकल फेरी काढण्यात आली. पहिल्या दिवशी असलेली संपाची तीव्रता दुसऱ्या दिवशी काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. बँकामध्ये गुरूवारी बऱ्यापैकी उपस्थिती दिसून आली. दरम्यान दोन दिवसांच्या संपामुळे कंपन्यांचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, निर्गुंतवणूक यांच्यावर नियंत्रण आणण्यासह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने देशभरात दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. या संपात नाशिकच्या सातपूर, अंबड या औद्योगिक क्षेत्रातील निम्म्यापेक्षा अधिक कामगारांनी सहभाग घेतल्याने त्याचा कामावर परिणाम झाला. संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आला असला तरी औद्योगिक संघटनांनी संमिश्र परिणाम झाल्याचे सांगितले. बँकांमध्येही आदल्या दिवशीच्या तुलनेत उपस्थिती बऱ्यापैकी वाढली. आदिवासी विकास कार्यालयासह इतर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये मात्र तुरळक उपस्थिती होती.
सातपूर औद्योगिक वसाहतीपासून दुपारी कामगारांची सायकल व मोटरसायकल फेरी काढण्यात आली. या फेरीच्या अग्रभागी सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड हे स्वत: सायकलीवर स्वार झाले होते. फेरीत सहभागी कामगार विविध घोषणा देत होते. नाशिकमध्ये संप कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले. दोन दिवसांच्या संपामुळे औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कामकाज ठप्प झाल्याने कोटय़वधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कामगार व कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी नाशिक येथे सातपूर औद्योगिक वसाहतीपासून सायकल व मोटरसायकल फेरी काढण्यात आली. कामगार व कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या फेरीत सीटूचे पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड यांसह हजारो कामगार सहभागी झाले होते.