विवाहितांचा हुंडय़ासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गिट्टीखदान व वाडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
प्रिया सोनल मिश्रा (रा. एम.बी. टाऊन बंधूनगर मानकापूर) हे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. रविवारी पहाटे गळफास घेतलेल्या स्थितीत ती आढळल्याने तिला मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तिचा पती आरोपी सोनल विनयकुमार मिश्रा, सासरा विनयकुमार, सासू सूमन, दीर चंचल, जाऊ प्रियंका चंचल यांनी तिचा हुंडय़ासाठी शारीारिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार स्मृती दिलीप तिवारी (रा. भीमनगर रामेश्वरी) यांनी अजनी पोलीस ठाण्यात केली. अजनी पोलिसांनी ती गिट्टीखदान पोलिसांकडे पाठविली. या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध  गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना १४ ऑगस्ट २०१३ रोजी अमरावती मार्गावरील सुराबर्डीच्या यूओटीसी वसाहतीत घडली. वसाहतीत क्षिप्रा इमारतीतल्या सातव्या क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या विद्या भरत शिंदे या विवाहितेने देवघरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी क्षिप्रा इमारतीतल्या तिसऱ्या क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये राहणारे अशोक नारायण रूपनारायण यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. सोलापूर जिल्ह्य़ातील पंढरपूर तालुक्यातल्या इसबावी पुनर्वसित गावात राहणारे विनोद बाजीराव मर्ढेकर यांची बहीण विद्याचे भरत शिंदे याच्याशी लग्न झाले. लग्नात रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची मनाजोगती पूर्तता न केल्याने तिचा पती भरत साहेबराव शिंदे व सासू विमल हे दोघे विद्याला क्रूर वागणूक देत होते. त्या त्रासाला कंटाळून विद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार विनोदने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.