उरणमधील मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतदारांना पैसे वाटप करणारे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस महादेव घरत यांच्या गाडीतून मोरा सागरी पोलिसांना ९९ हजारांच्या रोकडसह गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात घरत यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी दिली आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर उरण तालुक्यातील मोरा परिसरात उभ्या असलेल्या गाडीतून पैशाचे वाटप केले जात असल्याची तक्रार मोरा सागरी पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी डस्टर गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डस्ट बोर्डमध्ये पाचशे रुपयाच्या नोटा असलेले ९९ हजार रुपये आढळले.  दरम्यान, मावळ लोकसभेसाठी उरण परिसरातील २ लाख ४७ हजार ४८१ मतदारांवर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले होते. अधिकाधिक मतदार मतदानासाठी बाहेर पडवेत यासाठी राजकीय कार्यकर्ते सकाळपासूनच कार्यरत होते. घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. त्याचप्रमाणे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मतदारांसाठी खास थंडपेयांची सोय करण्यात आली होती.  सकाळी सात वाजतापासून उरणमधील २९१ मतदान केंद्रांवर मतदारांनी हजेरी लावली होती. संवेदनशील केंद्रांवर अधिकचा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामुळे केंद्रावर शांततेत मतदान सुरू असल्याचे चित्र होते. शहरी भागातील मतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसत होता. सकाळी उरण शहर परिसरात मतदान केंद्रांवर शुकशुकाट असताना, ग्रामीण भागात मतदान केंद्रावर गर्दी केलेली होती.